
सर्व प्रकारच्या औद्योगिक, व्यापारी आस्थापना, खासगी आस्थापनांमध्ये तक्रार निवारण समितीची स्थापना तात्काळ करा- संदेश आयरे
रत्नागिरी, दि. 20 : सर्व प्रकारच्या औद्योगिक, व्यापारी आस्थापना, खासगी आस्थापना जिथे १० किंवा १० पेक्षा जास्त कामगार आहेत. त्याठिकाणी तक्रार निवारण समितीची स्थापना तात्काळ करण्यात यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कामगार संदेश आयरे यांनी केले आहे.
महिलांच्या सुरक्षेतेसाठी, “कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३” पारित करण्यात आलेला आहे. यामध्ये कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती (ICC) गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सर्व प्रकारच्या औदयोगिक, व्यापारी आस्थापना, खाजगी आस्थापना जिथे १० किंवा १० पेक्षा जास्त कामगार आहेत. त्याठिकाणी या समितीची स्थापना तात्काळ करण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे. राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य, यांच्या दि.१८ डिसेंबर रोजीच्या रत्नागिरी जिल्हा येथे झालेल्या “महिला आयोग आपल्या दारी” कार्यक्रम व जनसुनावणीमध्ये आयोगाने अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या स्थापनेवर भर दिला असून आयोगाद्वारे समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्थापन केलेल्या समितीचे नाव व त्यांचा कार्यकाळ इ. माहिती आपल्या आस्थापनेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करुन ती सर्व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे. त्याची प्रत सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या aclrtg08@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवण्यात देण्यात यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. 000