
शिंदे गटाला समर्थन देणार्या चिपळुणातील पदाधिकार्यांची हकालपट्टी
चिपळूण : शिवसेनेची शिवसंवाद यात्रा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दि. 16 रोजी चिपळुणात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खा. विनायक राऊत यांनी चिपळुणात पत्रकार परिषद घेत शिंदे गटाला समर्थन देणार्या उप जिल्हाप्रमुखासह दोन महिला पदाधिकार्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, चिपळूण शहर महिला संघटक रश्मी गोखले, तालुका संघटक सुप्रिया सुर्वे यांची हकालपट्टी केल्याचे खा. राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चाळके यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता. यावरून ही पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदानंद चव्हाणांचा आम्हाला फारसा उपयोग नव्हता. जिथे गेलात तिथे समाधानाने राहा. त्यांना पश्चाताप होणार आहे, असे खा. राऊत यावेळी म्हणाले.