
निधी मंजूर होऊनही पोलिस वसाहतींचे कामाचे घोडे कुठे अडले ? समविचारीचा सवाल
रत्नागिरीः कोट्यावधींचा निधी मंजूर करुन येत्या दोन वर्षात पोलिसांसाठी बहुमजली निवासी इमारत बांधण्याची घोषणा झाली खरी पण प्रत्यक्षात तीन वर्षे उलटली तरी ही घोषणा अमलात न येता कागदावरच राहिल्याने पोलिस वसाहतींचा प्रश्न ‘जैसे थे’ राहीला आहे. याप्रश्नी महाराष्ट्र समविचारी मंचने सबंधितांचे लक्ष वेधले असून आंदोलनाची तयारी अवलंबली आहे.यापूर्वीही समविचारी मंचने या प्रश्नावर सतत उपोषण,निदर्शने,करुन लक्ष वेधले होते. अधिक वृत्तानुसार, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रतिवर्षी प्रमाणे पोलिस वसाहतींच्या दुर्दशेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रत्नागिरीत बहुमजली निवासी इमारत बांधण्याची घोषणा झाली होती.त्यासाठी काही कोटींचा निधी मंजूर झाल्याचेही जाहीर करण्यात आले होते.मात्र ही घोषणा प्रत्यक्षात अमलात आली नसल्याने पोलिस कूटुंबियांना यंदाही पडक्या सडक्या इमारतीत पावसाळा ढकलावा लागणार आहे.याबाबतीत महाराष्ट्र समविचारी मंचने गंभीर दखल घेतली असून पावसाळ्यापूर्वी या इमारतींची डागडुजी न झाल्यास पोलिस कुटुंबियांसह रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा समविचारीने दिला आहे. याबाबत समविचारी मंचच्या वतीने सर्वस्वी समविचारी मंचचे प्रमुख आणि माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीनिवास दळवी,युवाध्यक्ष निलेश आखाडे,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, राज्य महिला संघटक अँड.सोनाली कासार,आदींनी हा इशारा दिला. जिल्ह्यातील पोलिस वसाहती ब्रिटिश कालीन असून मोडकळीस आलेल्या आहेत.वारंवार लक्ष वेधूनही याबाबत गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.गेली सात वर्षे समविचारीने शासनाकडे पाठपुरावा करुन बहुमजली इमारत व्हावी म्हणून मागणी केली होती त्याला यश येऊनही तसेच निधी मंजूर होऊनही हे काम का रखडले असा प्रश्न केला आहे.पावसाळा तोंडावर आला आहे.यावर्षी केवळ दुरुस्तीवर भागणारे नाही.अतिवृष्टी,वादळ सदृष्य परिस्थितीत या इमारतीत राहणे धोकादायक आहे.कोरोना महामारीच्या काळात कर्तव्य बजावून घरी विश्रांती घेणारे पोलिस आणि त्यांची कुटुंबिय यांचे हाल बघवत नाहीत.असे नमूद करण्यात आले आहे. पोलिस वसाहतींच्या दुर्दशेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना रत्नागिरीत भव्यदिव्य बहुमजली पोलिस निवासी संकुल बांधण्याची जी घोषणा करण्यात आली होती त्या घोषणेचे काय झाले ? असा सवालही समविचारीने सबंधितांना केला आहे.घोषणा झाली, निधी पुर्तता झाली मग या कामाची सुरवात का झाली नाही ? याबाबतीत खुलासा करण्याची मागणी महाराष्ट्र समविचारी मंचने केली आहे.
www.konkantoday.com