मृत्यूसंख्येत मोठी तफावत असल्याने उच्चस्तरीय चौकशी व्हावी-अनिकेत पटवर्धन

कडक लॉकडाऊन काळातही वाढती संख्या चिंताजनक!

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व प्रशासनाने दिलेल्या मृतांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. ही तफावत ९३ मृतांची असून नेमके किती मृत पावले व कशामुळे मृत्यू झाला याची चौकशी होण्याची गरज आहे. वस्तुस्थिती लपवून आरोग्यमंत्र्यांची फसवणूक होत असेल तर याची गांभिर्याने दखल घ्यावी. निलंबन करून मार्ग निघणार नाही, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून ही चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मे रोजी 13 मृत्यू (एकूण मृत्यू 1239), 1 जून 7 (1246), 2 जून रोजी 8 (1254), 3 जून रोजी 8 (1262), 4 जूनला 16 (1278) आणि काल 5 जून रोजी 10 (1288) असे मृत्यू झाले आहेत. मात्र या आकडेवारीत काहीतरी गोलमाल आहे. कारण दररोज होणारे मृत्यू व एकूण आकडेवारी यामध्ये 93 मृत्यू यांचा फरक दिसताेय. म्हणजेच 1 जूनला 1, 2 जूनला 5, 3 जूनला 17, 4 जूनला 28 आणि 5 जूनला 42 मृत्यू जास्त झालेले दिसत आहेत. म्हणजे एकूण मृत्यू 1288 नव्हे तर 1330 झाले आहेत. परंतु आकडेवारीमध्ये तफावत करून काय साध्य होणार आहे? असा सवाल अनिकेत पटवर्धन यांनी केला.
या आकड्यांबाबत अशी बनवाबनवी का केली जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय अधिकारी नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी असल्याचे अनिकेत पटवर्धन म्हणाले. आम्ही राजकारण करतो, अशी टीका सत्ताधार्‍यांकडून केली जात आहे. परंतु आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर रुग्ण, नातेवाइकांच्या समस्या जाणून घेत आहोत. अनेकांचे स्वॅब घेऊन 7 दिवस झाले तरी त्यांना मेसेज किंवा रिपोर्ट मिळालेला नाही. आकडेवारीत तफावत ठेवून लॉकडाऊन उठणार असेल तर आनंद आहे, असे ते खेदपूर्वक म्हणाले.
गेले चार दिवस कडक लॉकडाऊन करूनही रुग्णांची संख्या वाढती आहे. लॅबवरचा ताण कमी करण्यासाठी दुसरी लॅब उभारण्याची घोषणा अजूनतरी हवेतच आहे. आकडेवारी लपवण्यामागचे कारण काय? रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था उभारण्यात सत्ताधारी मंडळी अपयशी झाले आहेत. मग अधिकार्‍यांना अभय का दिले जाते? रत्नागिरी जिल्हा रेड झोनमधून कधी बाहेर पडणार? याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.
रुग्णसंख्या थोपवण्यासाठी आता मंत्रीमहोदयांनी टास्क फोर्स घेऊन रत्नागिरीतच ठाण मांडून बसावे. जिल्ह्याच्या अधिकार्‍यांनीही सर्व ती काळजी घेऊन प्रत्येक कोविड सेंटरला भेट देऊन रुग्ण व नातेवाइकांची व्यथा जाणून घ्यावी. आढावा बैठका घेऊन काहीही निष्पन्न झालेले नाही. नव्याने सुरू झालेल्या अनेक कोविड सेंटर्समध्ये डॉक्टर, नर्स नसतील तर या सेंटर्सचा उपयोग कसा होणार? असे अनेक प्रश्‍न अनिकेत पटवर्धन यांनी उपस्थित केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button