
सिटी स्कॅनसाठीची इमारत लवकरात लवकर पुर्ण करा,आमदार योगेश कदम यांच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना
खेड :खेड तालुक्यातील रुग्णांना सिटी स्कॅनसारखी अत्यावश्यक सेवा विनाविलंब आणि कमीत कमी खर्चात मिळावी यासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाशेजारील जागेवर इमारत उभी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून हे काम जितक्या लवकर पुर्ण करता येईल तेवढे लवकर पुर्ण करावे अशा सुचना खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी यांना केल्या आहेत.
खेड तालुक्यातील जनतेसाठी चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने आमदार योगेश कदम यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन, ब्लड बँक, डायलेसीस यासारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत सिटी स्कॅनला अतिशय महत्व असल्याने ही सुविधा प्राधान्याने सुरु करण्यात येणार आहे.
कळंबणी उपरुग्णालय येथील शासकिय जागेवर सिटी स्कॅनसाठी इमारत उभी करता यावी यासाठी आमदार कदम यांनी आरोग्य मंत्रालयाकडे मागणी केली होती. त्यानुसार या ठिकाणी इमारत बांधण्याची परवानगी आणि आवश्यक असलेल्या निधीला मंजूरी मिळताच सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्या वतीने या ठिकाणी १३ x १३ मिटरची इमारत बांधण्यास सुरवात करण्यात आली.
शासनाकडून वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात या इमारतीच्या कामाला सुरवात करण्यात आली. आता ही इमारत पुर्णत्वास जात असून जूनच्या अखेरीस ही इमारत पुर्ण करून शासनाकडे हस्तांतरीत केली जाईल असे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. इमारतीचे काम वेळेत पुर्ण होण्याबरोबरच ते दर्जेदार व्हावे यासाठी आमदार योगेश कदम हे स्वत: या कामावर लक्ष ठेवून आहेत. इमारतीचे काम सुरु झाल्यापासून आमदार कदम यांनी याठिकाणी अनेकदा भेट देवून कामाची पाहणी केली. यावेळी बांधकामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक सुचनाही केल्या.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर सिटी स्कॅन ही सुविधा लवकर उपलब्ध होणे आवश्यक असल्याने दोन दिवसांपुर्वी आमदार कदम यांनी पुन्हा एका भेट देवून इमारतीचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सुचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या इमारतीचे काम पुर्ण होताच सिटी स्कॅन मशीन खरेदी केली जाणार आहे. या ठिकाणी सिटी स्कॅन ही सुविधा सुरु झाली की तालुक्यातील रुग्णांची सिटी स्कॅनची फार मोठी गैरसोय दुर होणार आहे. सिटी स्कॅन या सुविधेनंतर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ब्लॅड बँक आणि डायलेसिस या दोन महत्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
www.konkantoday.com