
खेड पंचायत समितीच्या सभापतिपदी मानसी जगदाळे
खेड : खेड पंचायत समितीच्या सभापतिपदी भरणे गणातून विजयी झालेल्या मानसी जगदाळे यांची निवड करण्यात आली. प्रभारी सभापती जीवन आंब्रे यांनी मानसी जगदाळे यांच्याकडे सभापतीपदाच्या पदभार सुपूर्द केला. वरिष्ठानी ज्या विश्वासाने सभापती पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही मानसी जगदाळे यांनी सभापती पदाची सूत्र हाती घेतल्यावर दिली.
पंचायत समिती सभापती पदाची मुदत संपल्याने पक्षाच्या आदेशानुसार खेडचे तत्कालीन सभापती विजय कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सभापती पदाचा प्रभारी पदभार उपसभापती जीवन आंब्रे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत मानसी जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जगदाळे यांची सभापती पदी निवड झाल्यावर खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन मानसी जगदाळे यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कदम, तसेच अन्य शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जगदाळे यांच्या सभापती निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
www.konkantoday.com