अशा डॉक्टरांना कोरोना रुग्णांवरील उपचारांबाबत वैद्यकीय तज्ञा मार्फत मार्गदर्शन करण्यात यावे- जि .प. अध्यक्ष विक्रांत जाधव
‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना जिल्ह्यात राबविताना घ्यावयाच्या खबरदारी बाबत जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना पत्र लिहिलं आहे. श्री जाधव यांनी पत्रात म्हटले आहे कि ‘कोरोना विरुद्धच्या लढ्यात राज्यातील सर्व खाजगी डॉक्टर्सना सहभागी करून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझा डॉक्टर’ ही अभिनव संकल्पना मांडून संपूर्ण राज्यातील फॅमिली डॉक्टरांशी नुकताच संवाद साधला. मुख्यमंत्र्यांची ही संकल्पना अत्यंत स्तुत्य आणि सरकारी दवाखान्यांवरील ताण कमी करणारी व पर्यायाने कोरोनाचा संसर्ग कमी करणारी आहे. परंतु, आपल्या जिल्ह्यात ही संकल्पना राबवित असताना काही गोष्टीची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना असंख्य रुग्णांनी सुरुवातीला खाजगी किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे उपचार घ्यायला सुरुवात केली. परंतु, अनेक रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि मन अशावेळी अधिक उपचारांसाठी त्यांना अन्य ठिकाणी दाखल करावे लागले. त्यात मोठया प्रमाणात मृत्यू झाले. ही गंभीर बाब लक्षात घेवून त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘माझा डॉक्टर’ या मोहिमेत जिल्हयातील किती डॉक्टर सहभागी होवू इच्छितात याची यादी तयार करण्यात यावी. अशा डॉक्टरांना कोरोना रुग्णांवरील उपचारांबाबत वैद्यकीय तज्ञमार्फत मार्गदर्शन करण्यात यावे आणि त्यांना कोरोना रूणांवर उपचार करण्यासाठीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. ‘माझा डॉक्टर’ या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रमाणित फॅमिली डॉक्टरांनाच कोरोना रुग्णांवर उपचारांची परवानगी देण्यात यावी. या मोहिमेत सहभागी न होणाऱ्या डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांवर उपचार केला जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची दखल आपल्या स्तरावर घेण्यात यावी. कोरोना रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार व्हावेत, मृत्यूदर कमी व्हावा, सरकारी दवाखान्यांवरील ताण कमी व्हावा, हाच उद्देश हे मुद्दे सूचविण्यामागे आहेत, असे जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com