
लांजात वीज पडून नारळाच्या झाडाने घेतला पेट
लांजा : नारळाच्या झाडावर वीज कोसळण्याची घटना शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथे घडली. तालुक्याच्या पूर्व भागात प्रचंड पाऊस पडल्याने काजळी नदीला पूर आला होता.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून आकाश ढगांनी भरून आले आणि त्यानंतर रिमझिम पावसाने सुरुवात केली. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रचंड कडकडाट करत वीज लांजा उपशेट्येवाडी येथील अनंत तानवडे यांच्या मालकीच्या नारळाच्या झाडावर कोसळली. या घटनेत नारळीच्या झाडाने पेट घेतला. सुदैवाने यामध्ये अन्य कोणतीही हानी झालेली नाही. मात्र विजेमुळे या ठिकाणी वीजवाहिनी तसेच काही घरांचे वीज मीटर बंद पडण्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी झालेल्या तुफानी पावसाने लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील पालू, कोचरी, सालपे, प्रभानवल्ली, खोरनिनको या गावांना पावसाने झोडपून काढले. या भागात झालेल्या प्रचंड पावसामुळे काजळी नदीला पूर आला. ऐन नवरात्र उत्सवात हजेरी लावल्याने तरुणाईचा हिरमोड झाला आहे.