
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय घाईत होणार नाही-विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
पुणे – ‘शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा कोठेही अवमान होणार नाही. संविधानिक तरतुदींचे पालन करत विधीमंडळाच्या आणि विधानसभेच्या सर्व नियमांचे पालन करून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. हा निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेला वेळ घेतला जाईल.
निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही. त्याचप्रमाणे न्याय करताना गफलत होऊ नये, म्हणून कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही,’ असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना ॲड. नार्वेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील न्यायालयीन प्रक्रियेबाबत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकेवरील सुनावणी सुरू झाली आहे. यासंदर्भात होणारी कार्यवाही नियमानुसार होत आहे. भारतीय संविधानाने कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्याय मंडळाला आपापले अधिकार दिले आहेत.
आपल्या कार्यक्षेत्रात राहून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे अबाधित ठेवावेत. न्यायालयाने अध्यक्षांवरच जबाबदारी दिली आहे. त्यामुळे कोठेही संविधानाचा अपमान होणार नाही. विधिमंडळ आणि न्यायमंडळ ही स्वतंत्र व्यवस्था असून मान राखणे हे कर्तव्य आहे.’
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णयाला दिरंगाई होत असल्याच्या विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ॲड. नार्वेकर म्हणाले, ‘संविधानातील तरतुदींनुसार देशाचा कोणताही नागरिक न्यायालयात याचिका दाखल करून शकतो. एखादी याचिका दाखल झाल्यानंतर नोटीस पाठविली जाते. त्यानंतर दोन्ही बाजू ऐकून न्यायालयात न्याय केला जातो.
सभागृहाबाहेर केलेल्या टिप्पणी अथवा वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही. त्यावर उत्तर देणे अजिबात गरजेचे समजत नाही. आरोप करणाऱ्यांना कायद्याचे किती ज्ञान आहे, त्यांना अपात्रतेसंदर्भातील नियमांचे ज्ञान आहे का! वैयक्तिक टिप्पणी करत निर्णय घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो. परंतु, टिपण्णी केल्यामुळे माझ्यावर दबाव येत नाही. जो निर्णय मी घेईल, तो नियमांवर आणि संविधानावर आधारित असेल.’
www.konkantoday.com