खते, बियाणं शेतकऱ्याला शेताच्या बांधावर पोहचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून आमचं नियोजन – बाळ माने
खते तसेच बियाणं शेतकऱ्यांच्या मागणी नुसार त्याला शेताच्या बांधावर पोहचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून आम्ही नियोजन करत असल्याची माहिती रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी दिली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
याबाबत बोलताना बाळ माने म्हणाले की, गेल्यावर्षी 64- 65 हजार हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी शेती केली, यावेळी ती किमान एक लाख हेक्टर पर्यंत शेती करूया असा संकल्प सर्वांनी करूया, गेल्यावर्षी जी पडीक शेतजमीन होती त्यामध्ये भात लागवड करणं आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी जी भाताची नवीन बियाणं आहेत ती संघामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जी रासायनिक खते, सेंद्रिय खते आहेत ती शेतकऱ्यांच्या मागणी नुसार त्याला शेताच्या बांधावर पोहचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून आम्ही नियोजन करत असल्याचं माने यावेळी म्हणाले. तसेच यावर्षी पाऊस चांगला होईल असा अंदाज हवामान विभागाचा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली भात उत्पादन कसं वाढेल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. केंद्राकडून हमीभाव भात खरेदीची योजना सुरू आहे, यावर्षी साधारणतः 2500 ते 2600 रुपये क्विंटलला भाव मिळाला, पुढच्या वर्षी तो वाढवा यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचं बाळ माने यांनी यावेळी सांगितलं.
तसेच खतांचे जे काही भाव वाढलेत किंवा वाढण्याची शक्यता आहे, यासाठी अनुदान मिळावं यासाठी राज्यातील भाजपकडून केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू असल्याचं माने यांनी यावेळी सांगितलं.
www.konkantoday.com