
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील अंतिम निर्णय दोन दिवसांनी होण्याची शक्यता
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला जाईल असं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. मुंबई हायकोर्टाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारला झापल्यानंतर आज महत्वाची बैठक घेण्यात आली होती.त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील अंतिम निर्णय दोन दिवसांनी होण्याची शक्यता आहे
विद्यार्थ्यांचे आरोग्य सरकारची प्राथमिकता आहे. पालकांमध्ये परीक्षा घेण्यावरुन भीती आहे. शिवाय तांत्रिक बाबी लक्षात घेता संपूर्ण विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. मुंबई हायकोर्टाच्या टिप्पणीवरही शिक्षणमंत्र्यांनी भाष्य केलं. सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. कोरोनाची स्थिती गंभीर असून अशा परिस्थित परीक्षा घेणे कठीण आहे. सरकारची बाजू हायकोर्टासमोर मांडू, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच परीक्षांसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
www.konkantoday.com