जिल्हाधिकाऱ्यानी शेतकऱ्यांची, सरकारची केली फसवणूक,भा.ज.पा प्रदेश उपाध्यक्ष श्री.माधव भंडारी यांचा आरोप
जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती राज्य शासनाला देवून शेतकऱ्यांची, सरकारची फसवणूक केल्याचा आरोप भा.ज.पा प्रदेश उपाध्यक्ष श्री.माधव भंडारी यांनी पत्रकारी परिषदेमध्ये केला. चक्रीवादळातील कोकणातील नुकसान व शासनाची अनास्था या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या पत्रकार परिषदेला श्री.केशव उपाध्ये, श्री. अभिजित पेडणेकर, श्री.समीर गुरव, श्री.सागर भडे आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांचे स्वागत भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष अड. दीपक पटवर्धन यांनी केले.
या पत्रकार परिषदेमध्ये श्री.माधव भंडारी म्हणाले कि, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पंचनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे केलेत कि नाहीत ? अशी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे या पंचनाम्याबाबत जिल्हा प्रशासन गंभीर आहे का ? असा प्रश्न भंडारी यांनी उपस्थित केला. बहुतांश नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे देखील झाले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कोकणकृषी विद्यापीठाच्या टास्कफोर्स तयार करून शास्त्रोक्त पद्धतीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे झाले पाहिजेत अशी मागणी श्री.भंडारी यांनी केली.
आजवर कोणतेही इतके असंवेदनशील सरकार मी पहिले नाही या सरकारची ऐकून घेण्याची चर्चा करण्याची मानसिकताच नसल्याची टीका श्री.भंडारी यांनी केली. भा.ज.पा.चे सरकार असताना ड्रोन कमेराच्या सहाय्याने नुकसानग्रस्तांचा आढावा घेण्यात आला होता याची आठवण त्यांनी यावेळी केली. गुहागरचे आ.भास्कर जाधव यांनी सुद्धा काही सूचना सरकारला केल्या आहेत. मात्र सत्ताधारी पक्षातील आमदाराचे म्हणणे ऐकून घेण्यात येत नाही तर आमचे कुठून ऐकणार ? असा टोला श्री.माधव भंडारी यांनी हाणला.
नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी भा.ज.पा. समांतर पंचनामा करणार असून त्यासाठी नुकसानग्रस्तांनी आपल्या नुकसानीचे व्हिडीओ आमच्याकडे पाठवावा अशी तांत्रिक संरचना येत्या दोन दिवसात निर्माण करून सरकारी यंत्रणेला जे नुकसान झाले नाही ते दाखावणार असल्याची माहिती श्री.भंडारी यांनी दिली. मदतीच्या निकषांमध्ये सूट व शिथिलता आणावी अशी मागणीही श्री.भंडारी यांनी केली. गतवर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाची अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. याचा पाठपुरावा करून आम्ही थकलो असून या वर्षाची तरी वादळग्रस्तांना लवकर मदत मिळावी अशी मागणी श्री.भंडारी यांनी केली.
ज्या शिवसेनाला कोकणाने हाथ दिला, ज्या शिडीच्या सहाय्याने शिवसेना सत्तेपर्यंत गेली आहे. त्याच शिडीला लाथाडण्याचे काम शिवसेना करत असल्याचा घणाघात श्री.भंडारी यांनी केला. एैन हंगामात आंबा तसेच आंब्यावर आधारित प्रक्रिया उद्योग तसेच मस्त्यउद्योग या सर्वांचा व्यापक अंगाने नुकसानीचा आढावा घेवून सरकारने मदत करावी अशी अपेक्षा श्री.भंडारी यांनी केली. सत्तेत येण्यापूर्वी ५०,०००/- मदत शेतकऱ्यांच्या बांधावर द्या अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सत्तेत येण्यापूर्वी केली होती. मात्र सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी किती दिवस वाट पहावी लागणार ? असा सवाल श्री.भंडारी यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेमुळे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांचे पाय कोकणाला लागले. नाहीतर येरवी या सरकारची जनतेशी बांधीलकीच नाही. आत्मियता, कणवता नाही हेच दिसून येत आहे, असा आरोप श्री.भंडारी यांनी केला.
www.konkantoday.com