नेपाळमध्ये परत जाणार्‍या गुरख्यांना आर्थिक भुर्दंडगुंड प्रवृत्तीचे लोक १३०० ऐवजी घेतात ४५०० रुपये उकळत आहेत, संबंधितांवर कारवाईची बाळ माने यांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

रत्नागिरी– रत्नागिरी, संगमेश्‍वर, लांजा, राजापूर आणि गुहागर तालुक्यात आंबा व मच्छीमारीसाठी हंगामात येणार्‍या २०ते २५हजार गुरख्यांची आता नेपाळला परत जाण्याची लगबग सुरू आहे. रेल्वे आणि तिथून रस्ते मार्गाने फक्त १३०० रुपयांत जाता येत असले तरी काही गुंड प्रवृत्तीच्या, हिस्ट्रीशीटर लोकांना गुरख्यांकडून ४५०० रुपये उकळत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

गेली अनेक वर्षे आंबा हंगाम आणि मच्छीमारीसाठी २० ते २५ हजार नेपाळी गुरखा बांधव येत आहेत. आता हे दोन्ही हंगाम संपत आल्यामुळे ते गावी परतू लागले आहेत. गेल्या वर्षी त्यांच्यासाठी खास प्रवासी रेल्वे सोडण्यात आली होती. रत्नागिरीतून मथुरेपर्यंत रेल्वेचे फक्त ८०० रुपये तिकीट आहे. तसेच तिथून उत्तर प्रदेश व नेपाळच्या बॉर्डरवरील गौरीफंटा या ठिकाणी रस्तेमार्गाने फक्त ५०० रुपये खर्च येतो. म्हणजे हे गुरखे १३०० रुपयांत आपल्या मायदेशी परतू शकतात.

परंतु यंदा कोरोनाच्या नावाखाली आणि जाणीवपूर्वक निवळी परिसरातील एका धाब्यावर परमेश्‍वराच्या नावाने लुटालूट चालू झाली आहे. हे गुंड व हिस्ट्रीशिटर लोक असून एका गुरख्याकडून प्रत्येकी ४५०० रुपये उकळत आहेत. त्यातील २५०० रुपये हे खासगी बसचालकाला मिळतात. मग प्रती गुरख्यामागे जादा २००० घेऊन त्याचा कोण लाभ घेत आहे, हे पाहिले पाहिजे. या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास पुढील वर्षी गुरखे कोकणात येणार नाहीत. त्याचा फटका आंबा बागायतदार व मच्छीमारांना बसू शकतो, असेही माने यांनी स्पष्ट केले.

खासगी बसची क्षमता ४० असताना या बसमध्ये ७० जण बसवले जात आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार आहे. तसेच या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट झाली आहे का, बसचा विमा उतरवला आहे का? कारण दुर्दैवाने अपघात झाल्यास कोण जबाबदारी घेणार? हे तत्काळ थांबले पाहिजे, अशी विनंती जिल्हा पोलिस अधीक्षकांना बाळ माने यांनी केली आहे.

३२००रुपये कोणाच्या खिशात?
१३०० रुपयांत होणार्‍या प्रवासासाठी जादा ३२०० रुपये घेतले जात आहेत. गुन्हेगारी वृत्तीचे लोक हा गोरखधंदा करत आहेत. तो बंद पडला पाहिजे. पाहिजे तर रेल्वे मंत्र्यांशी बोलून जादा रेल्वेगाड्या सोडता येतील. तशी आपणही रेल्वेला विनंती करू. जादा पैसे कमावणार्‍यांची बेबंदशाही थांबली पाहिजे. या गुंडांना राजाश्रय आहे का? याचाही छडा पोलिसांनी लावावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षकांना बाळ माने यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button