
महारथी, दि म्युझिशियन्स कार्यक्रम रंगणार लायन्स क्लब; नेत्ररुग्णालयाच्या मदतीकरिता आयोजन
रत्नागिरी लायन्स नेत्ररुग्णालय आणि लायन्स क्लबच्या विविध उपक्रमांच्या मदतनिधीसाठी सलग चौथ्या वर्षी लायन्स आर्ट अँड म्युझिक फेस्टचे आयोजन येत्या 9 व 10 जानेवारीला स्वा. सावरकर नाट्यगृहात केले आहे. यात बहुतांशी वेळा भारताबाहेर होणार्या ‘दि म्युझिशियन्स’ हा प्रसिद्ध वादकांचा अप्रतिम वाद्यवादनाचा कार्यक्रम व दुसर्या दिवशी ‘महारथी’ हे नाटक होणार आहे. दररोज रात्री 8.30 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे.
लायन्स नेत्ररुग्णालयात फिजिओ थेरपी सेंटर, ऑप्टोमेट्रीस्ट प्रशिक्षण केंद्र, भिंगांची फॅक्टरी आदी उभारण्यात येणार आहे. याकरिता मदतनिधी उभारण्यासाठी फेस्टचे आयोजन केल्याची माहिती म्युझिक फेस्टचे अध्यक्ष डॉ. शेखर कोवळे आणि लायन्स चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रमेश चव्हाण आणि लायन्सचे अध्यक्ष दीपक साळवी यांनी दिली.
दि म्युझिशियन्स या कार्यक्रमात वादक महेश खानोलकर (व्हायोलिन), अमर ओक (बासरी), सत्यजित प्रभू (सिंथेसायजर), नीलेश परब (ढोलक, ढोलकी), आर्चिस लेले (तबला) व दत्ता तावडे (ऑक्टोपॅड, ड्रमसेट) आणि निवेदक पुष्कर श्रोत्री यांचा सहभाग आहे. या सर्व मातब्बर कलाकारांची सुरवात झी वाहिनीवरील सारेगमप व अन्य संगीत कार्यक्रमांतून झाली. त्यानंतर त्यांना देश-विदेशात अनेक नामवंत गायक, वादकांबरोबर कार्यक्रमांत संधी मिळाली. हे सारे कलाकार आपापल्या क्षेत्रात कार्यरत असले तरी जेव्हा सातही जण एकत्र येतात तेव्हाच दि म्युझिशयन्स कार्यक्रम सादर केला जातो.
प्रख्यात अभिनेते परेश रावल यांची निर्मिती असलेले रहस्यमय नाटक ‘महारथी’ रत्नागिरीकर नाट्यरसिकांसाठी पर्वणी आहे. या नाटकामध्ये पूर्वी ओम पुरी, नसरुद्दिन शहा असे नामवंत सिने कलाकारही होते. याचे दिग्दर्शक विजय केंकरे, निर्माते विनायक गवांदे, नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, संगीत अजित परब, वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. मराठी नाटकामध्ये प्रख्यात अभिनेते सुनील तावडे, ‘राधा प्रेमरंगी रंगली’ फेम सचित पाटील, ‘का रे दुरावा’फेम अर्चना निपाणकर, ‘अवघाची संसार’फेम माधवी निमकर, विवेक गोरे, सुनील जाधव, आनंद पाटील आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनेक दिवसानंतर रत्नागिरीत रहस्यमय नाटक होत आहे. या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन लायन्स क्लबने केले आहे
www.konkantoday
com