
कोरोना संदर्भात आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठीही पालकमंत्री रत्नागिरी मध्ये येत नाहीत हे दुर्दैवी – अॅड. दीपक पटवर्धन
संपूर्ण जगभर कोरोनाचे थैमान सुरु आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्याची अॅलर्जी असल्याप्रमाणे पालकमंत्री रत्नागिरीत फिरकत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठकही मुख्यमंत्री रत्नागिरीत येवूनही बैठक मात्र सिंधुदूर्गात झाली तोच किस्सा पालकमंत्री महोदय गिरवत आहेत आणि रत्नागिरीवर अघोषित बहिष्कार घातला आहे असे म्हणावे असे वाटते.
रत्नागिरीमध्ये आज मास्कचा तुटवडा आहे, सॅनेटायझर चा तुटवडा आहे. आधिच पंगु झालेली शासकीय रुग्णालयाची अवस्था पहाता जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा आढावा घेवून उपाययोजना तसेच स्थानिक डॉक्टर्स, हॉस्पिटल चालक यांच्या मध्ये समन्वय करून कोरोना संदर्भाने उपाययोजना औषधोपचारा संदर्भाने केमिस्ट, ड्रगीस्ट बरोबर बैठका इ. अनेक महत्वाच्या विषयांची हाताळणी मा. पालकमंत्री महोदयांनी बैठका घेवून करणे अपेक्षित होते. मात्र DPTC बैठकीनंतर पालकमंत्री रत्नागिरीकडे फिरकलेले नाहीत. एकप्रकारे रत्नागिरी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडल्याचा हा प्रकार दिसतो. जिल्हा प्रशासन त्यांचे अधिकारी त्यांच्या स्तरावर कार्यरत आहेत. मात्र ही आपत्ती उद्भवल्यास या रोगाचा सामना करण्यासाठी व्यवस्था, साधन उपलब्ध कराव्या लागतील. सर्व व्यवस्थांमध्ये जो समन्वय लागेल त्यासाठी पालकमंत्र्यांनी दौरा करून विविध बैठका घेऊन निर्णय करणे, मंजुरी देणे आवश्यक होते. अंतर्गत राजकारणाचा फटका रत्नागिरीतील जनतेला बसू नये याची खबरदारी घेणे आवश्यक वाटते. ना. अॅड. परब साहेबांसारखे कद्दावर पालकमंत्री लाभूनही रत्नागिरी जिल्ह्याला प्रत्यक्षात पालक नाही अशी स्थिती दिसते अशी बोचरी टिका भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली.
रत्नागिरीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आता नागरिकांनीच स्वतःच पालकत्व स्वीकरून सतर्क रहाव, योग्य काळजी घ्यावी असे अॅड. पटवर्धन म्हणाले.