कोरोनाचा सामना करण्यासाठी निलेश राणे यांचा प्रशासनाला सहकार्याचा हात! कोरोना सेंटर, ऑक्सिजन आणि एम डी फिजिशियन देणार!जिल्हाधिकाऱ्यासह आमदार लाड यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक
रत्नागिरी कोरोना आणि ताउक ते चक्रीवादळामुळे आपत्तीत आहे, अशावेळी रत्नागिरीकरांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी आम्ही सर्वोतोपरी मदत करायला तयार आहोत असे आश्वासन भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना दिलेच पण कोरोना काळात गरज असलेला ऑक्सिजन पुरवठा, एम डी फिजिशियन डॉक्टर, कोरोना सेंटर सह पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन, डॉ विनय नातू, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांच्यासह परकार हॉस्पिटलचे डॉ. मतीन परकार आणि पदाधिकाऱ्यानी जिल्हाधिकारी यांची आज भेट घेऊन कोरोना आणि ताउक ते चक्रीवादळतील हानी याबाबत चर्चा करताना विविध उपाय सुचवले आणि मदतीचा हात पुढे केला. यावेळी दापोलीपासून राजापूर पर्यंत कोरोना साठी आवश्यक कोरोना केअर सेंटर, कॉन्ससेन्ट्रटर तसेच ऑक्सिजन याची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही भाजपा म्हणून एकत्रित काम करू अशी ग्वाही दिली. त्याचवेळी उपलब्ध कॉन्ससेन्ट्रटर तसेच ऑक्सिजन टँकर ची उपलब्धता सुद्धा करून दिली.
रत्नागिरी ची आरोग्य व्यवस्था गेली अनेक वर्षे विस्कळीत आहे. जे सतत निवडून गेले त्यांनी ती सुधारण्याचा प्रयत्न फारसा केला नाही. या उणीवा कोरोना काळात प्रकर्षाने दिसून आल्या आणि त्याचे वाईट परिणाम सामान्य माणसाने गेले वर्षभर भोगले. कोरोना वर इलाज करण्यासाठी आवश्यक एम डी फिजिशियन डॉक्टर ही उणीव रत्नागिरी जिल्ह्याला कायम आहे. यावर मंत्री खासदारांनी केवळ आश्वासने दिली आहेत. मात्र आज निलेश राणे यांनी जिल्ह्यात काम करण्यासाठी एम डी फिजिशियन उपलब्ध करून देत असल्याचे सांगितलेच परंतु अजून 3 डॉक्टर जिल्ह्यात सेवेत रुजू करण्यासाठी आपले प्रयत्न असतील असेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना स्पष्ट केले. निलेश राणे यांच्या सोबत आ. लाड यांनीही या मदतीची ग्वाही प्रशासनाला देताना आपल्या आमदार निधीतून तत्काळ मदत उपलब्ध होईल हे स्पष्ट केले.
या शिवाय ताउक ते चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांना देताना तिथल्या सामन्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. या सर्वांचे तत्काळ पंचनामे करून त्वरित मदत पोहोचवा अशी मागणी सुद्धा यावेळी केली. तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा अद्यापही पोहोचला नसताना लोकांचे पाण्याअभावी, विजेअभावी होणारे हाल मांडतानाच महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सामान्यांना मिळणाऱ्या वागणुकीची माहिती दिली. हे बदलले पाहिजे, प्रशासन कामाच्या ताणत आहे याची आम्हाला जाणीव आहे, याची जाणीव आम्हालाही आहे पण सामन्यांना योग्यच वागणूक मिळाली पाहिजे, आमचे संपूर्ण सहकार्य असेल असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
महामार्गाच्या परिस्थितीबाबत बोलताना निलेश राणे यांनी लांजा येथील हँग कंपनीच्या गलथान कामाची माहिती देताना लांजात अपघात होत असून याकडे जातीने लक्ष द्या अशी मागणी केली.
आपत्तीच्या काळात राजकारण बाजूला ठेऊन आम्ही काम करत असतो, प्रशासनाला आमचे संपूर्ण सहकार्य असते आणि राहील मात्र प्रशासनानेही तितक्याच जबाबदारीने सामान्यांचे जीवन सुरळीत होईल यासाठी तात्काळ पाऊले उचलली पाहिजे असेही स्पष्ट शब्दात त्यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही उपस्थित होते.
www.konkantodaycom