
ड्रग्स प्रकरणात मंत्री उदय सामंत यांनी घेतली गंभीर दखल, ड्रग्ज प्रकरणात जिल्ह्यातील सात जणांना तडीपार करणार
ड्रग्ज विळखा जिल्ह्यात वाढत असून, ड्रग्ज विक्री करणार्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यात काहीजणांची यादी तयार करण्यात आली असून, त्यातील सातजणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस दलाला दिल्या असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक ना. उदय सामंत यांनी घेतली. यावेळी पोलिस दलाला ड्रग्जबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या नंतर पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती देताना सांगितले की, राज्यासह जिल्ह्यातही ड्रग्जचा विळखा वाढत आहे. तरुण पिढी यात मोठ्या प्रमाणात गुरफटत असल्याचे दिसून येत आहे. ड्रग्जविरोधात पोलिस दलाने तीव्र मोहीम राबवावी. यात विक्री प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांची यादी तयार करण्यात आली असून, यातील सातजणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.