तौक्ते वादळाने तालुक्यात लाखोंची हानी; खेड चिपळूण मार्गावरील पशुराम घाटात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती

खेड : रविवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळात तालुक्यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. कुणाच्या घरांची पडझड झाली तर कुणाचे गोठे जमीनदोस्त झाली. आंबा बागायतदारांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उशीरा आलेला आंबा काढण्याजोगा होण्यासाठी अजून दहा ते १२ दिवसांचा अवधी होता मात्र रविवारच्या वादळामुळे झाडावरील सारा आंबा गळून पडल्याने आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शनिवारी सायंकाळी ५ वाजता सुरु झालेला निसर्गाचा तांडव सोमवार पहाटेपर्यंत सुरु होता. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे तालुक्यातील अनेकांच्या घरावरील कौले, पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी घरांच्या भितींची पडझड झाली. तहसिल कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ४५ घरांचे अंशता नुकसान झाले आहे. तर एका घराच्या भिंतीची पडझड झाली आहे. एका शेतकऱ्याच्या नागरांचा बैलही या वादळात बाधीत झाला आहे. येत्या काही दिवसात पेरणीला सुरवात होणार आहे. त्यानंतर लगेचच शेतीची अन्य मशागत करावी लागणार आहे. यासाठी नांगर महत्वाचा आहे. मात्र तौक्ते वादळाने नागरांच्या बैलाचाच बळी घेतल्याने शेतीची मशागत कशी करायची? हा प्रश्न त्या शेतकऱ्याला पडला आहे. कोरोनामुळे धंदा व्यवसाय बंद असल्याने लगेच दुसरा बैल खरेदी करण्याचे ऐपतही आता उरलेली नाही त्यामुळे करायचे काय? हा प्रश्न आहे.
सोसाट्याच्या वाऱ्याने ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. खेड दापोली मार्गावरील मोकल बागेजवळ भला मोठा वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला होता. ग्रामस्थ आणि वाहन चालक यांनी रस्त्यावर पडलेले झाड तोडून बाजूला केल्यावर हा मार्ग खुला झाला. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटातही एक वृक्ष उन्मळून रस्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतुक सुमारे १ तास खोळंबली होती. खेड येथील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कशेडी घाडात जावून रस्त्यात पडलेला वृक्ष तोडून बाजुला केला. त्यानंतर खोळंबलेली वाहतुक सुरळीत झाली. मुसळधार पावसामुळे खेड चिपळूण मार्गावरील पशुराम घाटात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आली. त्यामुळे हा रस्ता निसरडा झाल्याने या मार्गावरही वाहनांना ब्रेक लागला. रस्त्यावर आलेल्या मातीवरून अवजड वाहने चालविणे अवघड झाल्याने घाटात अवजड वाहनांची रांग लागली होती. रस्त्यावर आलेली माती महामार्ग चौपदरीकरणादरम्यान केलेल्या खोदाईची आहे. गेल्या वर्षी देखील पहिल्या पावसात हीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ठेकेदार कंपनीने ही माती रस्त्यावर येणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी होती. मात्र तशी कोणतीच खबरदारी न घेतली गेल्याने या वर्षीही हा घाट वाहन चालकांसाठी त्रासदाय ठरणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button