
रत्नागिरीत करोनाग्रस्त रूग्ण सापडला, जिल्ह्यात हाय अलर्ट, जीवनावश्यक दुकाने वगळता अन्य दुकाने, हॉटेल बंद राहणार
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर-शृंगारतळी येथील दुबईतून परतलेल्या रूग्णाला रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात संशयित रूग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या दाखल असलेल्या या रूग्णाची प्रकृती चांगली आहे. मात्र त्याला आता सध्या वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. आता दक्षता म्हणून या रूग्णाच्या कुटुंबियांची देखील तपासणी करून त्यांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. तसेच आता हा रूग्ण व त्यांचे कुटुंबिय असलेल्या शृंगारतळी परिसरात दक्षतेचे आदेश देण्यात आले असून हा भाग सध्या आरोग्यदृष्ट्या सील करण्यात आला आहे. हा परिसर आयसोलेट करण्यात आला आहे. तसेच यापुढील परिसर बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्ण सापडल्याने आता अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता हॉटेल, बार, धान्यदुकाने आजपासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात येत्या १५-२० दिवसात अनेकजण दुबई व परदेशातून आले असून त्यांनी आपणहून जिल्हा प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. परंतु अनेकांनी अद्यापही माहिती दिलेली नाही. त्यांचा आता पोलीस यंत्रणेमार्फत शोध सुरू करण्यात आला आहे. अशा दुबईसारख्या परदेशातून आलेल्या लोकांनी आपणहून जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी व आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क करावा असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. अशा लोकांनी माहिती लपविली आणि त्यातून साथ पसरली गेली तर अशा लोकांसह त्यांच्या कुटुंबियांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही मिश्रा यांनी दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सध्या सुरू असलेली बस व खाजगी वाहतूक पुढील काही दिवसांत बंद करण्याच्या दृष्टीनेही प्रशासन विचार करीत असून काही काळात तीही बंद करण्यात येईल. लोकांनी घाबरून जावू नये व जागरूकता दाखवावी अशा प्रकारची काही माहिती मिळाल्यास जिल्हा प्रशासनाला माहिती कळवावी असेही त्यांनी आवाहन केले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी देखील दुबई व परदेशातून जिल्ह्यात आलेल्या लोकांनी आपणहून पुढे येवून प्रशासनाला माहिती द्यावी, कोणतीही माहिती लपवू नये. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच लोकांनीही गर्दी करू नये. धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून जिल्ह्यातील ग्रामप्रदक्षिणेवरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. याचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com