
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर; कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन
रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले रविवार दि. 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यानिमित्त चिपळूणमध्ये जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसैन दलवाई, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार व पक्षाच्या सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, निरीक्षक ॲड. गुलाबराव घोरपडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्री. पटोले सकाळी 10 वाजता राजापूर येथील शासकीय विश्रामृहावर अभ्यागतांच्या भेटी-गाठी घेतील. सकाळी 10.45 वाजता ते मोटारीने शिवणे गावाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता शिवणे येथील रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या भेटी घेऊन श्री. पटोले त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. दुपारी 1 वाजता ते शिवणे येथून मोटारीने लांजाकडे प्रयाण करतील. दुपारी 1.30 वाजता ते लांजा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दुपारी 2.30 वाजता ते लांजा येथून मोटारीने चिपळूणकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4 वाजता चिपळूणमधील कापसाळ येथील श्रीमती लक्ष्मीबाई माटे सभागृहात रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात श्री. पटोले कार्यकर्त्यांना मार्गर्शन करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. पटोले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आणि चिपळूणचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.