
“ताउत्के” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर
अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका):- “ताउत्के” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे.
या दरम्यान जिल्ह्यातील आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.
आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 1 हजार 784 घरांचे अंशत: नुकसान तर 5 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एकूण 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
महावितरणच्या एकूण 65 HT पोलचे, 249 LT पोलचे तर एका ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात एकूण 100 कोविड रुग्णालये आहेत. त्यापैकी रायगड ग्रामीण क्षेत्रातील एकूण 55 कोविड रुग्णालयापैकी 26 रुग्णालये थेट वीजपुरवठयाद्वारे सुरु असून 29 कोविड रुग्णालये जनरेटर बॅकअपवर सुरळीत सुरू आहेत.