तौक्ते चक्रीवादळामुळे 447 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती
सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का.) दि. 16 – तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिवसभरात 447 घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. तसेच 37 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 143 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे, 10 शेडचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसान झालेल्या शेडमध्ये एका स्मशान शेडचाही समावेश आहे. त्याशिवाय 14 शासकीय इमारतीचे आणि 23 विद्युत पोल पडले असून 2 विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे.
तालुकानिहाय नुकसानीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तिथे 160 घरांचे नुकसान झाले आहे. 15 गोठ्यांचे, 2 शाळांच्या नुकसानीची माहिती आहे. 3 विजेचे खांबही पडले आहेत. तसेच एक स्मशानभूमी शेड आणि एक शेळीपालन शेडचेही नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात 90 घरांचे, 10 गोठ्यांचे, एका शाळेचे, 4 शासकीय इमारतींचे, एका शेडचे नुकसान झाले आहे. तसेच 6 विजेच्या खांबांचेही नुकसान झाले आहे. 6 ठिकाणी झाडं कोसळण्याची घटना घडली आहे. सावंतवाडी तालुक्यात 57 घरांचे, 3 गोठ्यांचे, 2 शेडचे आणि 2 विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. तसेच 57 ठिकाणी झाडे पडली आहेत. कुडाळ तालुक्यात 43 घरांचे, 3 गोठ्यांचे, 4 शेडचे आणि 3 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. तालुक्यात 12 ठिकाणी विजेच्या खांबाचे नुकसान झाले आहे. 53 ठिकाणी झाडे कोसळली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात 40 घरांचे, 2 गोठ्यांचे आणि 6 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. तर 5 ठिकाणी झाडे पडली आहेत. मालवण तालुक्यात 34 घरांचे, एका गोठ्याचे, एका शेडचे नुकसान आणि 3 ठिकाणी झाडे पडली आहेत. तर एका विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात 22 घरांचे, 3 गोठ्यांचे आणि एका शासकीय इमारतीचे नुकसान झाले आहे. एका विद्युत वाहिनीचे नुकसानीबरोबरच 6 ठिकाणी झाडे पडली आहेत. दोडामार्ग तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे तर 8 ठिकाणी झाडे पडली आहेत.
तर जिल्ह्यात एकूण 144 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील खवणे येथील 35 व्यक्ती, निवती मेंढा येथील 23 व्यक्ती, देवगड तालुक्यातील आनंदवाडी – तारामुंबरी येथील 44 व्यक्ती आणि देवगड येथील 7 व्यक्ती, मालवण तालुक्यातील देवबाग येथील 35 व्यक्तींचा समावेश आहे.
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दिलेल्या माहितीनूसार जिल्ह्यातील कोणतीही मच्छिमार बोट समुद्रात गेलेली नाही. सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.
सदरची माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सदरची माहिती जिल्हा आपत्ती व्यव्सथापन प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आली आहे.
00000