खेडमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे खोपी रामजीवाडी येथे घराचे नुकसान
खेड : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे शनिवार दुपारपासून खेडमध्ये झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाँधार पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळी पावसाचा फटका तालुक्यातील खोपी रामजीवाडी येथील लक्ष्मण बर्गे यांच्या घराला बसला. वादळामुळे बर्गे यांचे घर पुर्णपणे उद्धवस्त झाले असल्याने पाऊस तोडांवर आला असताना रहायचे कुठे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. बिजघर, कुळवंडी या भागातही वादळी पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे घर-गोठ्यांची पडझड झाली आहे.
तौत्के वादळाच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्ह्यात १५ व १६ तारखेला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार शनिवार सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आणि बघता बघता मेघगर्जनासह मुसळधार पाऊस कोसळू लागला. खेड तालुक्याच्या काही भागात मुसळधार पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही वहात होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेल्या खोपी रामजीवाडीला हा वादळाचा सर्वाधिक फटका बसला. या वादळात लक्ष्मण बर्गे यांच्या घरावरील कौले उडून गेल्याने बघता बघता बर्गे कुटुंबियांच्या डोक्यावरील छप्पर नाहीसे झाले. पाऊस तोंडावर आला असताना डोक्यावरील छप्पर नाहीसे झाल्याने पावसात रहायचे कुठे? हा प्रश्न बर्गे कुटुंबियांना पडला आहे. बर्गे यांच्या प्रमाणे वाडीतील आणखी काही शेतकऱ्यांच्या घराची आणि गोठ्याची पडझड झाली.
शनिवारी झालेल्या वादळात ज्या घरांचे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे त्या घरांचे गोठ्यांचे पंचनामे करण्यास महसुल विभागाने सुरवात केली आहे. वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com