
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये 34 हेक्टर जमीन गायब
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये 34 हेक्टर जमीन गायब झालेली आहे, ती जमीन शोधण्याचे काम सुरू आहे, उद्योजकांनी घाबरून जाऊ नये, कोणत्याही उद्योजकांचे प्लॉट रद्द केले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांच्या शंका दूर केल्या.आडाळी एमआयडीसीतील ज्या उद्योगांना जमीन मिळाली आहे, त्या प्लॉटच्या ताब्यासंदर्भात निर्णय आधीच घेण्यात आला असल्याचे ना. सामंत म्हणाले.
कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. सामंत म्हणाले, आठ दिवसांत मी स्वतः आडाळी एमआयडीसीला भेट देणार आहे. या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे आणि हरवलेली जमीन शोधून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. या जमिनीचे खरेदीखतसुद्धा झाले असल्याचे सांगितले.




