
आता बँक अकाऊंटमध्ये ५० हजार मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागणार, ‘या’ दिवसापासून नियम लागू!
ICICI Bank Minimum Balance : खासगी क्षेत्रातील मोठी बँक आयसीआयसीआयने बचत अकाऊंटमधील मिनिमम बॅलेन्सच्या मर्यादेत वाढ केली आहे. आता या बँकेच्या मेट्रो आणि शहरी भागातील ग्राहकांना बचत खात्यांमध्ये महिना सरासरी मिनिमम बॅलेन्स ५० हजार रुपये ठेवावा लागणार आहे. याआधी ही अट १० हजार रुपये ठेवण्याची होती. हा नियम १ ऑगस्ट २०२५ पासून लागू केला असून तो सर्व नवीन अकाऊंटना लागू होईल.
दरम्यान, हा बदल बँकेमध्ये उघडलेल्या सॅलरी अकाऊंट्सना हा नियम लागू होणार नाही. ज्यासाठी वेगळे नियम आहेत. २०१५ नंतर ICICI ने पहिल्यांदाच मिनिमम बॅलेन्स संबंधित नियमात बदल केला आहे.
बँकेने १ ऑगस्टपासून लागू केलेल्या सुधारित सेवा शुल्क नियमानुसार, निम-शहरी (semi-urban) ठिकाणी २५ हजार रुपये, तर ग्रामीण भागातील अकाऊंट्समध्ये १० हजार रुपये मिनिमम बॅलेन्स ठेवणे आवश्यक आहे. बँकेतील अकाऊंटसाठी आवश्यक असलेला मिनिमम बॅलेन्स जे ग्राहक ठेवणार नाहीत; त्यांना ६ टक्के अथवा ५०० रुपये, जो कमी असेल एवढा दंड आकारला जाईल. दरम्यान, पेन्शनधारकांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
याआधी, मेट्रो आणि शहरी भागातील अकाऊंट्समध्ये सरासरी मिनिमम बॅलेन्स १० हजार, निम-शहरी भागातील शाखांमध्ये ५ हजार आणि ग्रामीण भागातील २,५०० रुपये बॅलेन्सची अट होती.
रोख व्यवहारांची मर्यादा ‘जैसे थे’
बँकेने बचत अकाऊंटसाठी रोख व्यवहारांवर सध्या असलेली मर्यादादेखील कायम ठेवली आहेत. ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेच्या शाखांमध्ये दर महिन्याला तीन वेळा मोफत रोख रक्कम भरता येते अथवा पैसे काढता येतात. एकदा ग्राहकाने तीनपेक्षा जास्तवेळा व्यवहार केल्यास त्याला शुल्क आकारले जाते. हे शुल्क प्रति व्यवहार १५० रुपये अथवा प्रत्येक १ हजार रुपयांच्या व्यवहारासाठी ३.५० रुपये, यापैकी जी रक्कम अधिक असेल ती शुल्क म्हणून आकारली जाते.




