बेबंदशाहीतले लसीकरण-बाबा ढोल्ये माजी उपनगराध्यक्ष
काल मेस्त्री हायस्कुलच्या प्रांगणात लसीकरणासाठी आलेल्या वृद्धांचा अक्षरशः खेळ झाला.तापदायक उन्हात ताटकळत असलेल्या निरपराध नागरिकांची तडफड बघायला मिळाली.सावलीची काडीमात्र सोय नव्हती.गेट बंद होते.प्रशासनाचा ढिसाळ तितकाच ओंगळवाणा प्रकार बघायला मिळाला.
लस केव्हा येते ? साठा किती ? हे सांगितले जात नाही.मागणी करणाऱ्या नागरिकांवर वयोमान न बघता पोलिस दंडुकेशाही दाखवत होते.जमलेली गर्दी सार्वजनिक कार्यक्रमाला आलेली नव्हती.जाहीर केल्याप्रमाणे लसीकरणासाठी लोक आले.आता पहिला डोस आणि दुसरा डोस घेणाऱ्यांच्या स्वतंत्र रांगा लावण्याची जबाबदारी कोणाची ? या निमित्ताने अत्यंत क्लेशकारक तितकेच संतापजनक दृश्य समोर आले.या ना त्या निमित्ताने बढाया मारणा-यांचा सुकाळ फोफावला असतानाच हा झालेला संतापजनक प्रकार सर्वसामान्यांच्या मनात संताप निर्माण करायला कारणीभूत ठरला त्यात नवल काय ? यातील विशेष म्हणजे काही लाेक प्रतिनिधी प्रशासनाच्या चूकीवर पांघरूण घालून जनतेलाच शिस्तीचे डोस पाजत आहेत.ज्यांनी ज्यांनी हे पाहिले,भोगले, त्यांचे तळतळाट हे तापलेल्या सूर्य नारायणाहून अधिक होते.जमलेल्या गर्दीत काही वृद्धांना बोलायचे त्राण नव्हते.काही केवळ हात उंचावून मी मी माझा नंबर करीत होते.पोलिस लाठी फिरवित होते.ती लाठी गर्दीत कुणाच्या खांद्याला,डोक्याला लागत होती.दिलेल्या वेळेत जर गेट उघडले असते तर लांबच लांब लागलेल्या रांगेला विश्वास आला असता.
नियोजनाचा तो पुरता बोजवारा उडाला त्याला जबाबदार कोण ? त्याचे खापर त्या जनतेवर का ? या प्रश्नांची उत्तरे अनिर्णित आहेत.जणू सारा दोष लस घ्यायला आलेल्या जनतेचाच आहे असे भासविले जात आहे.काही महाभाग म्हणतात ‘फुकटची लस म्हणून जनतेला किंमत नाही.’ आता यात फुकटचे वा विकतचे याचा सबंध काय ? लोक सर्वप्रकारचे कर भरतात.त्यांना लसीकरण मोफत व्हायलाच हवे.यात संदेह नसावा.जागतिक महामारी ही आहे.पूर्ण व्यवस्थेसह नागरिकांच्या जीवीताची जबाबदारी शासनाची नाही मग कुणाची ? लोकांचे काय चुकले ? रांगा लावून शांततामय मार्गाने भर उन्हात उभे राहिलेल्या नागरिकांवर चुकीचे खापर का ? यातील प्रशासन याला कारणीभूत आहे.अव्यवस्थेचा परिपाक झाला.माणसं माणसांच्या गर्दीत दामटली गेली ही शिक्षा का म्हणून ? याला कुठेतरी आवर हवा.काही वृद्ध तर दमछाक झाल्याने व्यथीत झाली.उसासे टाकत ही बेबंदशाही सुरु होती.दमलेल्या वृद्धांनी थकव्याने जागा मिळेल तिथे थपकल मारली पण दंडूका फिरवणा-या पोलिसांना वा इतर कुणा नागरिकांना साधे सौजन्य दाखवता आले नाही.
लोकप्रतिनिधिंनी ही गोष्ट शुल्लक समजू नये.ही बाब जनतेच्या मनात कोरली गेलीय.साधी गोष्ट आहे.जितक्या लस उपलब्ध असतील त्या त्या प्रमाणात अन्य ठिकाणी नोंदणी करा.उर्वरितांना पुढील तारखा द्या.लसीकरण केंद्रावर वारेमाप गर्दी होणार नाही.ज्या तारखेला ज्यांची नोंदणी आहे.तितकेच लोक येतील.
काही नागरिकांच्या मते लसीकरण ठिकाणी राजकीय लोकांची लुडबुड चालते.ती बंद व्हायला हवी.अपंग नागरिकांनी रांग लावायची नाही असे सबंधित मंत्र्यांनी जाहीर करुनही त्याची अंमलबजावणी होत नाही.स्त्रीयांना स्वतंत्र रांग नाही.शिल्लक लस किती याचा मागमूस दिला जात नाही काही ठिकाणी लस संपूनही नागरिक लस मिळेल या आशेने तिष्ठत राहीलेले दिसतात.
शासनाने सबंधित प्रशासनाने हे ओंगळ प्रदर्शन थांबवावे.यावर साधे उपाय अवलंबता येतील.खाजगी दवाखान्यात महिन्या महिन्याचे नंबर दिले जातात.लोक त्या त्या नेमलेल्या तारखेला जातात.मग हे इथे का शक्य होत नाही ?
एकंदरीत सर्व बाजूने सामान्य जनतेची कुचंबणा सुरु आहे.जनता गप्प नाही पण हे सर्व बघून सुन्न आहे.सामान्य जनतेला दोषी ठरवून अपयशाचे खापर त्यांच्या माथी फोडू नका इतकीच अपेक्षा आहे.
जीवीत सुरक्षा ही प्रत्येकाला हवीय.लसीकरण ही या महामारीत आशेची पालवी आहे.शासन घोषणा करताना तारतम्य बाळगत नाही.45 वर्षावरील पहिला दुसरा डोस झाला नसताना 18 वर्षावरील युवकांना लसीकरण करण्याची घोषणा केली गेली.दुसरीकडे लसींचा तुटवडा आहे.
व्यापार धंदे सोडून लोक घरी बसलेयत.रोजचे व्यवहार चुकत नाहीत.विविध कर,बँक हप्ते,सुरु आहेत.मानसिक आधार असा कुणालाही उरलेला नाही.चारीबाजूने निराशेच्या गर्तेत अडकलेल्या लोकांकडून शासन या ना त्या मार्गाने लुटत आहे.कसलीही आर्थिक मदत नाही.फसव्या घोषणा होतात घरकामकरणारे,मजूर, आणि रिक्षावाले यांना 1500 रुपये आजतागायत मिळाले नाहीत.म्हणून मोफत लसीकरणात नियोजन ठेवा.सुत्रबंद्ध आखणी करा.मेहेरबानी म्हणून काही नको अधिकार म्हणून द्या.तसेच पालन प्रशासन आणि जनता यांनी करा.लसीकरणाला ‘मोल’ आहे त्या मोलाचे विद्रुपीकरण करु नका.ही जबाबदारी सर्वांची आहे.काळ कुणालाही क्षमा करीत नाही याचे भान सर्वाना हवे !