रत्नागिरी शहरात अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणा-या वाहन चालकांकडील एकूण २५ वाहने मागील दाेन दिवसांत जिल्हा वाहतूक शाखेकडून ताब्यात
कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 दिनांक 14/04/2021 रोजी 20.00 वा. पासून ते दिनांक 15/05/2021 रोजी 07.00 वा.पर्यंत लागू करण्यात आले आहे. तसेच मा.जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनीही शासनाच्या या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कडक निर्बंध लागू केले आहेत. नमूद आदेशान्वये या कालावधीत कोणत्याही नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वैध / अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास/ फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
गेले काही दिवस सकाळी 07.00 ते 11.00 वा.या कालावधीत कोरोना अनुषंगाने कोणतेही नियम न पाळता भाजीपाला व अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रत्नागिरी व चिपळूण येथील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत होती. रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेत सकाळी 11 वा.नंतर मेडीकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानंतरही लोकांची व वाहनांची गर्दी होत असल्याचे दिसून येत होते. अत्यावश्यक कारणांसाठीच बाहेर पडण्यासाठी मुभा असतानाही अगदी क्षुल्लक कारणासाठी लोक वाहनासह मोठ्या प्रमाणावर बाहेर येत असल्याचे निदर्शनास येत आहेत. या पार्श्वभूमीवर डाॅ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी रत्नागिरी व चिपळूण येथील बाजारपेठेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणा-या वाहनांवर कडक कारवाई करण्याबाबत आदेश जिल्हा वाहतूक शाखा व पोलीस स्टेशनला दिले आहेत. तसेच आवश्यक कारणांसाठी बाहेर पडलेल्या लोकांकडूनही वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावरही कारवाईचे आदेश दिले आहेत.
या अनुषंगाने काल दिनांक 09/05/2021 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मोटार वाहन कायद्यान्वये एकूण 886 वाहनांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली असून रूपये 3,19,600/- दंड आकारण्यात आला आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविणा-या एकूण 385 वाहन चालकांवर प्रत्येकी500/- रू. दंडाची कारवाई करण्यात आली.
तसेच रत्नागिरी शहरात अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणा-या वाहन चालकांकडील एकूण 25 वाहने मागील 02 दिवसांत जिल्हा वाहतूक शाखेकडून ताब्यात घेण्यात आली असून ती लाॅकडाऊन संपल्यानंतरच संबंधितांना परत केली जाणार आहेत. सदरची मोहिम यापुढेही चालूच राहणार असून अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नये असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.
www.konkantoday.com