आपण जिल्हाधिकारी झाल्याचे गावात खोटे सांगितले आणि हा खोटेपणा लपवण्यासाठी बनावट जीआर काढला आणि अर्जुन संकपाळ पोलिसांच्या जाळ्यात सापडला
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या बदलीचा खोटा जीआर काढल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात कोल्हापूर येथील अर्जुन संकपाळ हा सापडला खरा पण त्याने हे नेमके कशासाठी केले असावे असा प्रश्न सर्वांना पडला होता पण एक खोटे पचवण्यासाठी दुसरे केलेले खोटे कृत्य त्याला महागात पडले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात आल्याचे आता उघड होत आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उपवडे पैकी न्हाव्याचीवाडी हे अर्जुन सकपाळचे गाव आहे. त्याची घरची परिस्थिती बेताची, घरही लहान, घरी दुभती जनावरे असे साधारण घरचे चित्र होते. अभ्यासात हुशार असून त्याचे शिक्षण बीपी.एड.पर्यंत झाले असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली; पण सात वर्षांपूर्वी त्याने शक्कल लढवली व आपण आयएएस परीक्षा पास झाल्याने जिल्हाधिकारी बनल्याचे सांगितले गावातील तरुण जिल्हाधिकारी झाल्याने गावाने जल्लोषी मिरवणूकही काढली. त्यानंतर त्याचा स्तर उंचावला. तो गावातून गायब झाला. त्यानंतर गुजरातमध्ये एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनल्याचे अनेकांना सांगितले. वर्षातून तीन-चार वेळा आलिशान मोटारीतून दिमाखात येत होता, काही तासांचा वावर दाखवून पुन्हा जात होता. त्याचे गावात मोजकेत मित्र होते.
त्याच्या या रुबाबाला भुलून जिल्ह्यातील एक निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक बळी पडले, त्यांनाही त्याने आपण गुजरातमध्ये जिल्हाधिकारी असल्याचे भासवल्याचे समजते, त्यांच्या मुलीशी गेल्याच वर्षी त्याचा कोकणातील एका रिसॉर्टवर विवाह झाला आहे. आता देखील त्याने याच रिसॉर्टवर मुक्काम ठोकला होता तेथूनच त्याने शासनाचे उपसचिवांच्या नावाने बनावट डिजिटल सहीचा वापर करून तीन अधिकाऱ्यांच्या बदलीचा खोटा आदेश तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पत्रात त्याने आपलेच नाव घातले होते. मात्र रत्नागिरी पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला
www.konkantoday.com