
एसटी महामंडळाकडे तब्बल ८० टक्के बसेस मुदतबाह्य
. *मुंबई :* राज्यातील एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात सापडले असल्याने १५ टक्के भाडेवाढीचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. दररोज दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाचा दैनंदिन प्रति किमी खर्च ५८.९१ रुपये आहे, परंतु प्रति किमी उत्पन्न ५५.४५ रुपये आहे. त्यामुळे प्रति किमी एसटीला ३.४६ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. राज्यातील ७७ टक्के खेडेगावापर्यंत थेट एसटी जोडलेली असून ९२ टक्के लोकसंख्येस एसटीची थेट प्रवास व्यवस्था उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते.महामंडळाकडे आठ वर्षांवरील एसटीची संख्या सुमारे ८० टक्के असून आठ वर्षांच्या आत केवळ २० टक्केच बस असल्याने प्रवासी भाडे वाढताना नागरिकांना सुरक्षित व चांगली वाहने दिली गेली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे.
आठ वर्षांच्या आत बसेस, वाहन ताफ्याची कार्यक्षमता वाढत असून परंतु आठ वर्षांखालील केवळ २० टक्के वाहने महामंडळाकडे असल्याने वाहनांची कार्यक्षमता सध्या ढिसाळ स्वरूपाची आहे. वाहनांचे सरासरी आयुर्मान दहा वर्षे सात महिने आहे. वाढीव आयुर्मानामुळे वाहनांत दैनंदिन मार्गस्थ बिघाड होतो, मार्ग बंद होऊन वाहनांच्या खर्चात वाढ झाल्याने तोट्यात वाढ होत आहे.
वाहन ताफ्याचे आयुर्मान कमी करण्यासाठी महामंडळाकडून ताफ्यात नवीन बसेस घेऊन भाडेतत्त्वावरील बसेसदेखील समाविष्ट करणे गरजेचे आहे. सध्या महामंडळाकडे दहा वर्षांच्या पुढील वाहने तब्बल ९ हजार ४३९ असून दहा वर्षांच्या आतील वाहने पाच हजार ५९८ इतकीच आहेत. महामंडळास शासनाकडून १२०९.६३ कोटी रुपये येणे असून प्रवासी कर प्रतिपूर्तीचे वार्षिक ४२० कोटी व टोल माफीचे २४० कोटी शासन स्तरावर निर्णय होऊन मिळणे अपेक्षित आहे.महामंडळाकडून मागील प्रवासी भाडेवाढ ऑक्टोबर २०२१ मध्ये झाली होती.