
मुंबईहून थेट लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबारपर्यंत क्रूझ सेवा सुरू करणार
देशाच्या समुद्रपर्यटनात क्रांतिकारक पाऊल टाकत मुंबई आता ‘क्रूझ कनेक्टिव्हिटी’चे नवे केंद्रबिंदू होण्याच्या वाटेवर आहे. नुकत्याच उद्घाटन झालेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलनंतर मुंबईहून थेट लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबारपर्यंत क्रूझ सेवा सुरू करण्यात येणार आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल हे देशातील सर्वात मोठे टर्मिनल असून दरवर्षी दहा लाखांहून अधिक प्रवाशांना जलमार्गेसेवा देण्याची क्षमता आहे. मुंबईहून केवळ गोवा, कोची किंवा श्रीलंकाच नव्हे, तर हिंदी महासागरातील लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार बेटांपर्यंतही लवकरच क्रूझसेवा उपलब्ध होणार आहे.सध्या कॉर्डेलिया क्रूझ कंपनीकडून मुंबईहून गोवा आणि कोचीसाठी नियमित सेवा दिली जात आहे. त्यानंतर आता रिसॉर्ट वर्ल्ड क्रूझेस’कडून पावसाळ्यानंतर इतर आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा सुरू करण्यात येणार आहे. अंदमान-निकोबारसारख्या लांब पल्ल्याच्या आणि पर्यटनदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांसाठी क्रूझसेवा सुरू झाल्यास, देशांतर्गत पर्यटनात भरीव वाढ होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला.