
रिफायनरीतील नोकऱ्यांचे फक्त गाजर नको,तर मुख्य प्रवाहातील किती नोकऱ्या कोकणी तरुणांना मिळणार हे शासनाने जाहीर करावं!
रत्नागिरी(प्रतिनिधी):- कोकणात रिफायनरीच्या नावाने रोजगाराची स्वप्न दाखवली जात असली तरी वास्तवात या रिफायनरी मध्ये निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसाठी कोकणातील तरुणांमध्ये त्याबाबतचे कौशल्य निर्माण केले गेले आहे का?रिफायनरी साठीच्या नोकऱ्यांचे मनुष्यबळ कोकणात उपलब्ध करण्यात आले आहे का?की येथील महत्वाच्या नोकऱ्या या परप्रतियांच्या घशात घालून स्थानिकांवर अन्याय केला जाणार आहे असा सवाल गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.
मागील 10 वर्षांपासून कोकणात रिफायनरीच्या नावाने गोंधळ घातला जात आहे.रिफायनरी होणार ,नाही होणार या भांडणात कोकणची 10 वर्षे वाया घालवण्यात आली आहेत.रिफायनरी व्यतिरिक्त अन्य उद्योग व्यवसाय याकडे बघण्याची शासनाची मानसिकता नाही.जणू काही एका रिफायनरी मुळे कोकण सुजलाम सुफलाम होणार आहे असा आव आणला जात आहे ,जो दुर्दैवी आहे.ज्या रिफायनरीच्या निमित्ताने कोकणात रोजगार निर्मिती होईल अशी स्वप्न कोकणातील नागरिकांना दाखवली जात आहेत त्या रिफायनरी मध्ये असणाऱ्या मुख्य स्वरूपाच्या नोकऱ्यांपैकी किती नोकऱ्या स्थानिक तरुणांना मिळणार आहेत याची आकडेवारी सरकारने जाहीर करायला हवी.रिफायनरी साठी लागणारे मनुष्यबळ मागील 10 वर्षात निर्माण करण्याचा प्रयत्न शासनाने केला का?त्यासाठी काय उपक्रम राबविण्यात आले का?रिफायनरी मध्ये असणाऱ्या मुख्य प्रवाहातील नोकऱ्यांसाठी लागणारे मनुष्यबळ येथे उपलब्ध नसेल आणि बाहेरच्या लोकांना संधी मिळणार असेल तर याचा फायदा कोकणातील जनतेला काय होणार?असा प्रश्न सुहास खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.रिफायनरीच्या परिसरात निर्माण होणारे चहाचे ठेले,वडाप,वाहतूक यापलीकडे मुख्य रिफायनरी मध्ये कोकणी माणूस कुठे असणार याबाबत सरकारने स्पष्टता द्यायला हवी.येथील रोजगाराच्या संधी अन्य लोकांच्या घशात जाऊन स्थानिक माणूस विस्थापित होणार असेल तर हा प्रकल्प स्थानिकांसाठी फायद्याचा ठरणार नाही असे स्पष्ट मत खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.निर्माण होणाऱ्या रोजगाराचे नियमन झाले नाही तर कोकणी माणूस स्वतःच्या घरात उपरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.लाखो रोजगार निर्मिती होईल असे गाजर तरुणांना दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात सुशिक्षित कोकणी तरुणांना कशा स्वरूपाचे जॉब उपलब्ध होतील याची माहिती मिळणे गरजेचे आहे,मनुष्यबळ विकसित करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत असे खंडागळे यांनी म्हटले आहे.रोजगाराच्या मुद्यांवर कोकणातील तरुणांनी जागृत असणे गरजे असून आपल्या हक्काच्या नोकऱ्या हिरावल्या जाणार नाहीत यासाठी सतर्क असायला हवे असे खंडागळे यांनी म्हटले आहे.