नांदीवडे गॅस टर्मिनलच्या कामाचा नाहरकत दाखला खोटा असल्याचा आरोप! कारवाई करण्याची ॲड. स्वप्नील पाटील यांची मागणी!!


जयगड येथील जिंदाल कंपनीच्या नांदीवडे येथील गॅस टर्मिनलच्या कामाचा असलेल्या नाहरकत दाखला खोटा असून त्याची जिल्हाधिका-यां मार्फत चौकशी व्हावी. तसेच याबाबतचा अहवाल येत्या १५ दिवसात द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी केली आहे.

याविषयीचे निवेदन देत, हा नाहरकत दाखला खोटा निघाल्यास कंपनीवर कारवाई करुन येथील शेतकरी व ग्रामस्थांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे ही म्हटले आहे. जिंदाल कंपनीच्या नांदिवडे येथील गॅस टर्मिनल विरोधात येथील ग्रामस्थांचा लढा सुरु आहे. या विरोधात ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केली आहेत. या बाबत न्यायालयीन लढा देखील सुरु ठेवला आहे.

नांदिवडे येथील या प्रकल्पा बाबत घेण्यात आलेल्या बैठकीत जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे येथील कामाचा ना-हरकत दाखला असल्याचे सांगितले होते. मात्र या ना-हरकत दाखल्याची पडताळणी करण्यात आली असता त्या दाखल्यावर जावक क्रमांक व ठराव दिनांक नसल्याचे उघड झाले आहे. अशा नाहरकत दाखल्याची दफ्तरात कुठेही नोंद नसल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी केला आहे. याविषयी पाटील यांनी रत्नागिरी जिल्हाधिका-यां ना निवेदन देत बोगस ना-हरकत दाखल्याची चौकशी करुन १५ दिवसात अहवाल देण्याची मागणी केली आहे.

या ना-हरकत दाखल्याची कोणतीही अधिकृत नोंद सापडली नसल्याचे ॲड. पाटील यांनी नमुद केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या चौकशीमध्ये हा नाहरकत दाखला खोटा आढळल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करून गॅस टर्मिनल तात्काळ स्थलांतरित करण्यात यावा. तसेच जिंदाल कंपनीने स्थानिक ग्रामस्थांचे शेती, मच्छिमारी आणि फळबाग यांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ॲड. स्वप्नील पाटील यांनी रत्नागिरी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button