महाविकास आघाडी सरकारने राज्यात आज गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले
मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत ठरल्यानुसार महाविकास आघाडी सरकारने राज्यात आज गुरुवारी रात्री ८वाजल्यापासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यानुसार शहर व जिल्हांतर्गत प्रवासावर निर्बंध आणण्यात आले असून केवळ सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, रुग्ण यांनाच लोकलने प्रवास करता येणार असून सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाही. बसमध्येही केवळ ५० टक्केच प्रवाशांना प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. सरकारी कार्यालयांत केवळ १५ टक्केच कर्मचाऱयांची उपस्थिती राहणार असून जिल्हांतर्गत प्रवासात १४ दिवस होम क्वॉरंटाइनचा स्टॅम्प मारला जाणार आहे.
वाढणाऱया कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने उद्यापासून लागू केलेले निर्बंध १ मेच्या सकाळी ७वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.याअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व राज्य व केंद्र सरकारी कार्यालये १५ टक्के क्षमतेने सुरू राहणार. आरोग्य सेवा वगळता अन्य ज्या अत्यावश्यक सेवा सरकारने ठरविल्या आहेत तिथेही ५० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱयांची उपस्थिती नसावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
१४ दिवस होम क्वारंटाइन स्टॅम्प
खासगी बसेसना केवळ ५०टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक करता येणार. बसमध्ये उभ्याने प्रवासाला बंदी करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान दोनपेक्षा अधिक थांबे घेता येणार नाहीत. थांब्यांवर उतरणाऱया प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाइनचे स्टॅम्प मारले जाणार. जर कोणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला कोरोना उपचार केंद्र किंवा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. प्रवासी उतरण्याच्या ठिकाणी रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करण्याबाबत जिल्हाधिकाऱयांनी निर्णय घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे उतरणाऱया प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प मारण्याच्या निर्बंधातून सूट द्यायची की नाही हे स्थानिक प्रशासनाने तेथील परिस्थितीनुसार ठरवायचे आहे.
लांब पल्ल्याच्या गाडय़ा किंवा राज्य परिवहनमधून प्रवास करणाऱया प्रवाशांची माहिती संबंधित प्रवासी उतरणार असलेल्या ठिकाणच्या प्रशासनाला द्यावी लागणाऱ सर्व प्रवाशांना १४ दिवसांचा होम क्वॉरंटाइनचा स्टॅम्प मारावा लागणार. प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे स्कॅनिंग करून तसेच लक्षणे आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागणार. या नियमांचे पालन करण्याचे किंवा ते शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
रुग्णासोबत एकालाच प्रवासाची मुभा
सरकारी कर्मचाऱयांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱयांना देण्यात आलेल्या ओळखपत्रावर त्यांना तिकीट किंवा पासेस उपलब्ध केले जातील. सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, लॅब तंत्रज्ञ, रुग्णालय तसेच मेडिकल क्लिनिकमधील कर्मचाऱयांना ओळखपत्रावर रेल्वे, मोनो, मेट्रोतून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. आजारावरील उपचारांसाठी ती व्यक्ती व त्याच्यासोबत एका व्यक्तीला प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारी परिवहन सेवेतही ५० टक्के प्रवाशांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
लग्नकार्य दोन तासांत आटोपावे लागणार
लग्नकार्य केवळ दोन तासांत २५ जणांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
www.konkantoday.com