
दापोलीत दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला , ४५ हजाराची चोरी
दापोली शहरातील एका देशी दारु दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश करून गल्ल्यातील ४५ हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दापोली बसस्थानकानजिक असलेल्या सायली देशी बार व बिअर शॉपीचे मालक दीपक रसाळ यांनी ९ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता दुकानातील गल्ल्यात ४५ हजार रुपये ठेवून उर्वरित रक्कम बरोबर घेवून दुकान बंद करून ते घरी गेले.
काल बुधवारी सकाळी ८.३० वा. दुकान उघडण्यासाठी ते दुकानाजवळ आले असता त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप उचकटून टाकले असल्याचे त्यांना दिसले. दुकानात जावून त्यांनी गल्ल्यात पाहिले असता गल्ल्यात असलेली ४५ हजाराची रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच दुकानातील सीसीटीव्ही बंद करून त्याचीही चोरट्याने नासधूस केली असल्याची तक्रार दीपक रसाळ यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
www.konkantoday.com