गर्दीमध्ये बैठका घेण्यात खासदार, आमदार मश्गुल, आधीआरोग्य व्यवस्था सुधारा -भारतीय जनता युवा मोर्चाचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन
रत्नागिरी काेरोनाचा कहर वाढलेला असताना खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी हे रत्नागिरी व राजापूरमध्ये भरपूर गर्दीमध्ये आढावा बैठका घेण्यात मश्गुल आहेत. त्यांनी आधी आरोग्य व्यवस्था सुधारावी बैठका घ्याव्यात. बैठका घेऊन अधिकारी व कर्मचार्यांना आपत्तीत ढकलू नये, बैठका ऑनलाइन घ्याव्यात, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली.
राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना आज खासदार राऊत व आमदार साळवी यांनी कामाचा आढावा घेतला, अशी पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यासोबतच्या फोटोंमध्ये भरपूर गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. त्याची चर्चा विविध माध्यमातून सुरू झाली.
या संदर्भात अनिकेत पटवर्धन म्हणाले, काल जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार, आमदारांनी बैठक घेतली. त्यानंतर या कार्यालयातील ३८ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज असताना या बैठका कशासाठी घेतल्या जात आहेत. शवविच्छेदन अहवाल मिळायला २४ तासांचा कालावधी लागत आहे. पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्या सुधारण्यासाठी खासदारांनी लक्ष घातले पाहिजे. आमदार साळवी यांच्या राजापूर तालुक्यात शिवभोजन थाळीबाबत अद्याप कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे तिथल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. बैठका बंद करून आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे.
अनावश्यक बैठकांमुळे अधिकारी, कर्मचारी वेठीस धरले जात आहेत. ते यावर बोलू शकत नाहीत. खासदारांच्या बैठक व दौर्यातील कार्यक्रमांना पन्नासहून अधिक लोक उपस्थित असल्याचे छायाचित्रांवरून दिसत आहे. जिल्ह्यात आज पाचशे रुग्ण आढळले आहेत, मग अशा आढावा बैठका घ्याव्यात का? याचा विचार खासदार, आमदारांनी केला पाहिजे. काल रत्नागिरीत अनावश्यक, बिनकामाच्या फिरणार्या नागरिकांची जशी अँटीजेन टेस्ट केली, दंड आकारणी केली त्या प्रकारे अशा बैठका घेणार्यांवर जिल्हाधिकारी, पोलिस कारवाई करणार का? असा सवालही अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे
www.konkantoday.com