
पालकमंत्री उदय सामंत यांचे कडून जिल्ह्यात ठाकरे गटाला दे धक्का सुरूच.
राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला टार्गेट केलं असून जिल्ह्यातील उरली सुरली ठाकरे शिवसेनाही संपवण्याकडे पावले टाकली जात आहेत.सामंत यांनी ठाकरे गटाला धक्का देताना चिपळूणच्या माजी तालुकाप्रमुखासह प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांना फोडले आहे. त्यामुळे आगामी स्थानिकच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
जिल्ह्यात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री उदय सामंत उद्योगांसोबतच विकासाचा झंझावात आणत आहेत. त्यामुळे आपणही बाळासाहेबांच्या विचारासोबत गेलो पाहिजे, ही भावना सर्वसामान्य शिवसैनिकांची झाली आहे, असे स्पष्टीकरण देताना उबाठा शिवसेनेचे चिपळूणचे माजी तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी शिवसेना सोडण्याचे भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी जिल्ह्यात शिवसेना उरलीच कुठे असा सवाल करतानाही नव्याने पक्षात येणाऱ्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे.
झगडे यांनी, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात सन्मान दिला जातोय. याच लोकांच्या हातात पक्षाची धूरा देवून जुन्या शिवसैनिकांना पक्षाची निष्ठा शिकवण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. पण गेली वर्षांनुवर्ष ज्यांच्या विरोधात काम केलं आज त्यांच्यासोबत काम करताना कुठे तरी आपण स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून दूर होत असल्याची भावना निर्माण होतेय असल्याचेही झगडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचेच काम करणार असल्याचे झगडे यांनी जाहीर केलं आहे.