“अग्निपथ योजना” प्रखर राष्ट्रभक्तीचे प्रज्वलन करत नवयुवकांच्या जीवनाला दिशा देणार – ॲड. दीपक पटवर्धन

मा.नरेंद्रजी मोदी यांनी अग्निपथ योजना जाहीर करत देशातील २३ वर्षापर्यंतच्या युवकांना ४ वर्षांसाठी लष्करामध्ये भरती होण्याची संधी उपलब्ध करून दिली. लाखो युवकांना सैन्यामध्ये जाऊन देशसेवा करण्याची संधी, त्याचबरोबर रोजगार संधी या योजनेतून प्राप्त होणार आहे. केवळ १० वी पास ही शैक्षणिक पात्रता ठेवून अग्निपथ भरती होणार असल्याने देशातील लाखो युवकांना ही एक सुसंधी आहे. १० वी झाल्यानंतर पुढे काय ? हा प्रश्न अनेक युवकांना भेडसावत असतो व युवावर्ग नकारात्मकतेच्या गर्तेत जातो. मात्र मोदीजींनी अग्निपथ योजना सुरू करून धाडसी, उत्साही ऊर्जा स्तोत्राने भरपूर असलेल्या युवा वर्गाच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे.
ही अग्निपथ योजना कशी आहे ते समजून घेऊन मोठ्या संख्येने युवकांनी अग्निपथ सैन्य भरती मध्ये सहभागी होण्यासाठी पुढे आले पाहिजे.
अग्निपथ – सैन्यव्यवस्थेसाठी पूरक आणि युवकांनाही संधी
अग्निपथ सैन्य भरती मध्ये समाविष्ट होणाऱ्या युवकाला ‘अग्निवीर’ संबोधण्यात येणार आहे. चार वर्षांसाठी सैनिक म्हणून युवकांना भरती केले जाणार आहे. भरतीनंतर आवश्यक ट्रेनिंग त्यांना देऊन प्रशिक्षित केले जाणार आहे. सैन्यदलात केवळ सीमेवर अगर देशांतर्गत सुरक्षा एवढेच काम नसते हे आपण समजून घेतले पाहिजे. सैन्य व्यवस्था नेटकी चालण्यासाठी अनेकविध व्यवस्था कराव्या लागतात. या व्यवस्था करण्यासाठी मनुष्यबळ लागते. सैनिक म्हणजे शस्त्रास्त्र चालवणारी व्यक्ती असा अर्थ काढणे खूपच मर्यादित स्वरूपाचे आहे. अग्निवीरांना प्रशिक्षण देताना त्यांच्यात असलेले गुण पारखून त्यांना सैन्य व्यवस्थेत चार वर्ष विविध ठिकाणी काम दिली जातील. अग्नीवीरांपैकी २५% जवानांना प्रतिवर्षी नियमित लष्करी सेवेत समाविष्ट करण्यात येणारे आहे. हे या योजनेतील एक खास वैशिष्ट्य आहे. अग्निवीरांना सैन्यात सामील केल्याने आपल्या सैन्य दलाचे सरासरी वय हे २४ वर्षापर्यंत खाली येईल. याचा अर्थ आपल्या सैन्य दलाला अधिक ऊर्जावान सैनिक प्राप्त होतील. सरासरी वय कमी करण्यासाठी अग्निपथ योजना उपयुक्त ठरेल. अनेक देशांमध्ये प्रत्येक युवकाने ठराविक वर्ष सैन्यासाठी देणे अनिवार्य असते. प्रखर राष्ट्रभावना जागृत करत देशाप्रती समर्पणाची भावना चेतवण्यासाठी सैन्यांमध्ये सेवा करणे अनेक देशात अनिवार्य असते त्याच धरतीवर फक्त ऐच्छिक स्वरूपात युवा पिढीला सैन्यदलात सामावून घेण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे.
देशसेवा करतांना भविष्याची तरतूद
४ वर्षांमध्ये पहिल्या वर्षी २ लाख ५२ हजार, दुसऱ्या वर्षी २ लाख ७७ हजार, तिसऱ्या वर्षी ३ लाख ०६ हजार, चौथ्या वर्षी ३ लाख ३६ हजार इतकी म्हणजे ४ वर्षाची मिळून ११ लाख ७२ हजार इतकी रक्कम अग्निवीरांना प्राप्त होणार आहेच. अधिक चौथ्या वर्षानंतर ११ लाख ७१ हजार एवढी रक्कम अग्निवीरांना चौथ्या वर्षी सेवा समाप्त करताना प्राप्त होणार आहे. म्हणजे चार वर्षात अग्नीवीराला २३ लाख ४३ हजार इतकी रक्कम प्राप्त होणार आहे. हा आर्थिक लाभ सोडून उत्तम प्रशिक्षण, खाणे, कपडे, लॉजिंग, बोर्डिंग अत्यंत शिस्तीची जीवन शैली आणि प्रगल्भ दृष्टिकोनाचा विकास या जीवन घडवण्यासाठी आवश्यक गोष्टी अग्नीवीरांना प्राप्त होतील कि ज्या आयुष्यात सदैव उपयोगात आणता येतील. तसेच अग्नीवीरांच्या जीवनाचा विमा काढून दुर्दैवाने काही घडल्यास ४४ लाखांचे विमा कवच देतानाच जर अग्नीवीर दुर्दैवाने अपंग झाल्यास स्वतंत्र १५ लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच ४ वर्षानंतर सैन्यातून जबाबदारी मुक्त होताना एक विशिष्ट सर्टिफिकेट दिले जाणार आहे. तसेच अशा अग्नीवीरांना अनेक आस्थापनांमध्ये नोकरीसाठी प्राधान्य दिले जाऊ शकते. भारतात असलेले अनेक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्येही अग्नीवीरांना संधी मिळू शकते.
४ वर्षानंतर काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावेळी निवृत्त लष्करी जवानांना ज्याप्रमाणे विविध सेवांमध्ये सामाविण्यासाठी योजना काम करते तशाच पद्धतीने अग्नीवीरांनाही विविध व्यवस्थांमध्ये सामावलेले जाऊ शकते.
अग्निपथ कडे डोळसपणे पहा
अग्निपथ योजना डोळसपणे समजून घेण्याची गरज आहे. सैन्याचे कंत्राटीकरण वगैरे बालिश टीका झाल्या. मात्र वास्तवता लक्षात घेतली तर देशातील लाखो युवकांना देशसेवेत देश संरक्षण कार्यात सहभागी करून प्रखर राष्ट्रभावनेने प्रेरित झालेले नागरिक तयार करणे, ऊर्जेने, उत्साहाने, धाडसाने परिपूर्ण असलेल्या युवकांच्या सेवा देश संरक्षणार्थ उपलब्ध करून घेणे तसेच युवकांना शिस्तप्रिय बनवतानाच एक प्रगल्भ दृष्टिकोन तयार व्हावा म्हणून संस्कारित करताना रोजगाराची संधीही उपलब्ध करून देणे आणि देशाच्या सैन्यदलाला भरपूर असं सैन्यबळ उपलब्ध करून घेणे असे अनेक उद्देश अग्निपथ योजनेच्या माध्यमातून साध्य होणार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढी ते संस्कार आता लिप्त पावत असताना अग्निपथ योजनेत सैन्यभरती करण्याचे योजून परत एकदा प्रखर राष्ट्रभक्तीची भावना प्रेरित करण्याचा उद्देशही साध्य होणार आहे.
२४ जून २०२२ पासून नोंदणी
दि.१४ जून २०२२ रोजी हि योजना लागू करण्याचा निर्णय घोषित झाला. अग्निपथ योजनेमध्ये अग्नीवीरांच्या भरतीची प्रक्रिया २४ जून २०२२ रोजी नोंदणी ऑनलाइन सुरू होईल. २४ जुलै २०२२ रोजी ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सुरू होईल. आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, दहावी-बारावीचे मार्कशीट, मेडिकल सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी हे कागदपत्र तसेच कोणत्याही दंग्यांमध्ये, विध्वंसक कृत्यांमध्ये सहभागी नसल्याचे स्वसांक्षाकीत घोषणापत्र हे कागद सर्वसाधारणपणे अग्निपथ भरतीसाठी नोंदणी करताना लागतील. या योजनेचे स्वागत करण्यासाठी जनमानस तयार आहे. मात्र केवळ राजकीय कलुषीत दृष्टीने या अग्निपथ योजनेला विरोध केला जात आहे. चुकीची माहिती देत युवकांना भडकवल जात आहे. खरं पाहिलं तर राष्ट्रप्रेमी युवकांना देशसेवा करतांना भरीव अर्थ उपलब्धी करून देणारी, जीवनाला वेगळी उज्वल दिशा देणारी ही योजना आहे. प्रत्येक युवकाच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारी आणि भविष्यात भरपूर संधी देणारी ही अग्निपथ योजना आहे. २४ ते २५ वर्षाच्या दहावी व बारावी शिक्षण असलेल्या युवकाला एकरकमी ११ लाखाची टॅक्स फ्री रक्कम प्राप्त होणार आहे. त्या रकमेची योग्य गुंतवणूक करून स्वावलंबनाने हा अग्निवीर आपले भवितव्य उज्ज्वल घडवू शकेल. तसेच सैन्यात काम करून आल्याचे सर्टिफिकेट असलेला हा अग्निवीर सन्मानित नागरिक म्हणून ओळख निर्माण करतानाच अन्य युवकांचे प्रेरणास्थान बनेल. आणि यातूनच भविष्यातही अग्नीवीरांची सलग शृंखला देश संरक्षणासाठी सदैव तयार राहील.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अग्निपथ योजनेला आंधळेपणाने विरोध न करता या योजनेची माहिती युवा वर्गापर्यंत पोहोचवत आपल्या भागातील युवावर्गाला नवीन दिशा देणाऱ्या या योजनेत सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणे खूप मौलिक ठरेल. अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीर होण्याची अनिवार्यता योजनेत नाही. कोणालाही या योजनेत सहभागी होण्यासाठी बंधन घातलेले नाही. पूर्णतः ऐच्छिक असलेली ही प्रखर राष्ट्रभाव जाज्वल्य देशप्रेमाची भावना जागृत करतानाच युवकांच्या आयुष्याला आर्थिक बळ देत दिशा देणाऱ्या या योजनेचे स्वागत करत युवकांचा सहभाग वाढता ठेवू या.
जय हिंद
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button