बेकायदेशीर लॉकडाऊनमुळे व्यापार्यांचे नुकसानविरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे समस्या मांडणार-माजी आमदार बाळ माने यांची व्यापारी महासंघाला ग्वाही
रत्नागिरी- बेकायदेशीरपणे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे व्यापार्यांचे भरपूर नुकसान होत आहे. सामान्य व्यापारी भिकेकंगाल होणार आहे. त्यामुळे व्यापार्यांची ही समस्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याकडे नक्की मांडू, अशी ग्वाही भाजपचे माजी आमदार तथा रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिली.
रत्नागिरी व्यापारी महासंघाचे नूतन शहराध्यक्ष गणेश भिंगार्डे, तालुकाध्यक्ष निखिल देसाई, अमोल डोंगरे, अमेय वीरकर यांनी आज 8 एप्रिल रोजी माजी आमदार माने यांची मारुती मंदिर येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी व्यापारी महासंघाच्या वतीने या लॉकडाऊनमुळे कशा प्रकारे व्यापार्यांचे नुकसान होत आहे, याची माहिती देण्यात आली.
वाढत्या कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात दर शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु आला सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्येही बेकायदेशीर पद्धतीने, फसवणुकीने लॉकडाऊन लावला आहे. यामुळे रत्नागिरी बाजारपेठेची अर्थव्यवस्था बिघडली आहे. गेल्या वर्षी सुमारे पाच महिन्यानंतर बाजारपेठ सुरू झाली होती. पण पाच महिने दुकानातील कामगार, पार्सल गाड्यांमध्ये अडकलेला माल, तसेच अनेक दुकाने कायमची बंद करण्याची वेळ व्यापार्यांवर आली.
नोव्हेंबरपासून दुकाने सुरळित सुरू झाली होती. हळुहळू जनजीवन सुरळित होऊ लागले. पण आता पुन्हा लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था डबघाईस जाणार आहे. मागील वेळेस काही जणांना नुकसान भरपाई मिळाली होती. ती भरपाई पुन्हा मिळणार का? मागील लॉकडाऊनच्या काळामध्ये बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ दिली होती. या वेळीही तशीच मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी व्यापार्यांनी केली.
30 एप्रिलपर्यंत दर शनिवार व रविवारी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याला देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. पण सोमवार ते शुक्रवारच्या लॉकडाऊनला विरोध करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात श्री. फडणवीस व आमदार दरेकर यांची भेट घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळावी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करू, अशी ग्वाही बाळ माने यांनी दिली.
www.konkantoday.com