
राजापूर तालुक्यात विविध ठिकाणी नवरात्र उत्सवाचे आयोजन
राजापूर : शारदीय नवरात्र उत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी नवरात्र उत्सव मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आडीवरेची श्री महाकाली, देवीहसोळची आर्यादुर्गा, रायपाटणची श्री वडची आई यांसह अन्य देवतांच्या मंदिरात नवरात्र उत्सवाला आरंभ होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील वातावरण भक्तिमय बनले आहे. दरम्यान तालुक्यात ठिकठिकाणी देवीची स्थापना करून दांडिया अर्थातच गरबा नृत्याची लगबग जोमाने सुरू आहे. राजापूर तालुक्यात दरवर्षी नवरात्र उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. नऊ दिवस चालणार्या या उत्सवादरम्यान तालुक्यातील ठिकठिकाणी असलेल्या मंदिरात नवरात्र उत्सव दिमाखात सुरू होतो. यामध्ये घट स्थापन करणे, दररोज मंदिरात दर्शन, रात्री आरत्या, भजने, प्रदक्षिणा आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम असे उत्सवाचे स्वरूप असते. तालुक्यात सर्वत्र प्रसिध्द अशी आडीवरेची श्री महाकाली, कालिकामाता, देवीहसोळची श्री आर्यादुर्गा, माडबनची भगवती देवी, राजापूरची निनादेवी, रायपाटणची श्री वडचीआई यासहीत अनेक मंदिरात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. श्री महाकाली, कालिकामाता, आर्यादुर्गा, वडचीआई आदी मंदिरात तर दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिरात मोठी गर्दी उसळते. दरवर्षी तिसर्या, पाचव्या व सातव्या माळेला (नवरात्र उत्सवाचे दिवस) मोठी गर्दी लोटते. यातील काही देवतांची मंदिरे ही जागृत असून नवसाला पावणारी अशी सर्वत्र ख्याती आहे. तालुक्यातील या मंदिरातील नवरात्र उत्सवामुळे वातावरण भक्मिमय बनते. तालुक्यात अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना करून तेथे उत्सवाचे आयोजन केले जाते. खास आकर्षण असे गरबानृत्य (दांडीया रास) याचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात राजापूर, ओणी, पाचल, जवळेथर यांसह विविध भागात दरवर्षी गरबानृत्य लक्षवेधी ठरते.