
खेड तालुक्यात महामार्गाचे काम पूर्ण होण्यास २०२२ उजाडणार,वाढीव कामांमुळे कशेडी-परशुरामघाट चौपदरीकरण रखडले
खेड :खेड तालुक्याच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मे २०२० अखेर ठेकेदार कंपनीला हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे होते मात्र चौपदरीकरणाच्या कामात काही ठिकाणी ओव्हर ब्रिज वाढविण्यात आल्याने कशेडी ते परशुराम घाटादरम्यानचे काम पूर्ण व्हायला २०२२ उजाडणार आहे.
आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कशेडी घाटाचा पायथा ते परशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमीटरचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रुक्चर या कंपनीने घेतले तेव्हा या कामात भरणे, पीरलोटे आणि दाभीळ येथील ओव्हरब्रिजचे काम समाविष्ट नव्हते. त्यामुळे या ४४ किलोमीटरचे काँक्रीटीकरण मे २०२० अखेर पूर्ण केले जाईल असे आश्वासन ठेकेदार कंपनीकडून देण्यात आले होते. कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे कामही वेळेत पुंर्ण होण्याच्या मार्गावर होते. दरम्यान कोरोना महामारीमुळे लॉक डाउन झाले आणि मजूर गावाकडे परतल्याने महामार्गाचे काम ठप्प झाले. कोरोनाची पहिली लाट काही अंशी ओसरल्यावर गावाकडे गेलेल्या मजुरांना पुन्हा बोलावून ठेकेदार कंपनीने कामाला सुरुवात केली. मे २०२१ अखेर ४४ किलोमीटर महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचेच हा कंपनीचा निर्धार होता. मात्र भरणे, दाभीळ आणि पीर लोटे या तीन ठिकाणि ओव्हर ब्रिज बांधण्याचे काम वाढले आणि चौपदरीकरणाचे काम पुन्हा एकदा रखडले.
सद्य स्थितीत भरणे, दाभीळ आणि पीर लोटे या तीन ठिकाणच्या ओव्हर ब्रिजचे काम सोडले तर अन्य ठिकाणचे चौपदरीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे एखाददुसऱ्या किलोमीटरचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले नसेल परंतु ते काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल परंतु परशुराम घाटाचा काही भाग आणि तीन ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने कशेडी ते परशुराम घाट या ४४ किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्यास २०२२ उजाडणार हे निश्चित!
www.konkatoday.com