
किल्ले घेरा यशवंतगड वर साध्या पद्धतीने ३८ वी शिवजयंती साजरी
राजापूर तालुक्यातील नाटे मधली शिवजयंती संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे. दर वर्षी शिवछत्रपतींची भव्य मिरवणूक काढून तिथी प्रमाणे येणारी शिवजयंती साजरी केली जाते. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शिवप्रेमींनी मिरवणूक न काढता किल्ले घेरा यशवंतगड वर साध्या पद्धतीने ३८ वी शिवजयंती साजरी करण्याचे ठरवले. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत किल्ले घेरा यशवंतगड वर शिवजयंती साजरी केली गेली. सकाळी ८.३० वाजता किल्ले घेरा यशवंतगड वर महापुरुषाची पूजा करण्यात आली. सकाळी ९.३० वाजता सडापेठ नाटे येथील गणेशमंदिर मध्ये शिवप्रतीमेला श्री. दिवाकर मोदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व श्री. दिलीप लकेश्री यांनी गणेशपूजन केले. त्यानंतर ठराविक शिवप्रेमींच्या उपस्थितीत किल्ले घेरा यशवंतगड वर शिवप्रतिमेला श्री माधव ठाकूर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दिवसभरात अनेक शिवप्रेमींनी किल्ल्यावर येऊन शिवप्रतीमेचे दर्शन घेतले आणि किल्ल्यावर फेरफटका मारला. सदर कार्यक्रमात कुमार निषाद नितीन बांदकर यांने शिवाजी महाराजांच्या जीवनावर गीत सादर केले तर कुमारी समृद्धी साखरकर हिने शिवाजी महाराजांविषयी आपले विचार व्यक्त केले. या वर्षी प्रथमच किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली गेल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. शिवजयंती साजरी करण्यासाठी शिव संघर्ष संघटने सोबत स्थानिक ग्रामस्थ, महिला तसेच ओम् साई समर्थ मित्र मंडळ, व्यापारी संघटना नाटे इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होते.
www.konkantoday.com