
पट्टेरी वाघाचे कातडे बनावट असल्याचा संशय; तपासासाठी पाठवणार पुण्याला, तस्करांना पोलिस कोठडी
चिपळूण : पट्टेरी वाघाचे कातडे तस्करीसाठी आणलेल्या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र हे कातडे बनावट असल्याचा संशय वनविभागाला आला असून पुणे येथील प्रयोगशाळेत हे कातडे पाठविले जाणार आहेत. यानंतरच हे कातडे पट्टेरी वाघाचे की बनावट हे स्पष्ट होणार आहे. घोणसरे-चिवेली फाटा येथे तिघांना पोलिस व वन विभागच्या अधिकार्यांनी जेरबंद केले. यामध्ये हेमंत भिकू रामाणे (46, रा. आड, ता. म्हसळा, जि. रायगड, सध्या रा. नवरत्न चाळ बोरिवली), दिनेश लक्ष्मण तांबीटकर (48, रा. बामणोली, ता. चिपळूण), आशितोष मुकुंद धारसे (22, रा. मोटवली, ता. महाड-रायगड) यांचा समावेश आहे. हे कातडे कणकवलीहून आणल्याचे संबंधित आरोपीनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिस त्याचा तपास करीत आहेत. दरम्यान हे कातडे बनावट असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पट्टेरी वाघाचे बनावट कातडे मोठ्या किमतीत विकून पैसे मिळविण्यासाठी केलेली ही कृती असल्याने फसवणुकीचा गुन्हाही या प्रकरणात दाखल होऊ शकतो. प्रत्यक्षात पट्टेरी वाघाचे कातडे व सापडलेले कातडे यामध्ये मोठा फरक आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.