
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना३० नोव्हेंबरपर्यंत विमा हप्ता ऑनलाईन पध्दतीने भरावा -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे
*रत्नागिरी, दि. 10 : जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत काजू व आंबा पिकाकरिता दि.30 नोव्हेंबर 2023 आहे. या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बँक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा तसेच अधिकच्या माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा तसेच पीक विम्यासाठी फळपिकांची नोंद सातबारा उता-यावर बंधनकारक असल्याने ई पीक पाहणी ॲपद्वारे फळपिकांच्या नोंदी करून घ्यावे, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कु-हाडे यांनी केले आहे.
जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्या धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते आणि शेतक-यांना आर्थिक नुकसान स्वीकारावे लागते. शेतक-याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते. येत्या आंबिया बहारासाठी योजनेमध्ये सभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले असून, अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे सरंक्षण करा.
*योजनेचे वैशिष्ट्ये*
जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. (आंबा, काजू फळपिक वय ५ वर्ष ) कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतक-यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. एका शेतक-यास अधिसूचित फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल.विमा अर्ज सोबत फळबागेचा Geo Tagging असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील.
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता –
आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये व विमा हप्ता 13 हजार 300 रुपये व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपाये व विमा हप्ता 5 हजार रुपये असा असणार आहे. संभावित हवामान धोके हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग आर्द्रता इ. माहिती स्वयंचलित रित्या नोंदवली जाते.या माहितीच्या आधारे अवेळी पाऊस कमी जास्त तापमान, वारा वेग त्याच प्रमाणे गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकरी यांना फळपिकांसाठी विमा संरक्षण मिळते. सदर हवामान धोके लागू झाल्यानंतर विमा धारक शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळते.
www.konkantoday.com