
चिपळुणात नाट्यगृहाचे उत्पन्न आणि खर्चाचे गणित जुळेना.
तब्बल १८ वर्षानी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र वर्षभरापूर्वी सुरू झाले. या वर्षभरात नाट्यगृहात ६० लहान मोठे कार्यक्रम सादर झाले. त्यातून नगर परिषदेला ३ लाख ५० हजार इतके उत्पन्न मिळाले. मात्र वीजबिलापोटी तब्बल १२ लाख ७६ हजार × रुपये इतका खर्च आला आहे. अन्य खर्चाचा हिशोबच नाही. त्यामुळे हा पांढरा हत्ती नेमका कसा पोसला जाणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत असून प्रशासनाला तोटयाची कारणे व उपाययोजना शोधाव्या लागणार आहेत.चिपळूणला सांस्कृतिक वारसा आहे. ती जपण्यासाठी काही वर्षापूर्वी येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली. सुरूवातीच्या काळात येथे सादर होणारी नाटके व अन्य कार्यक्रम यामुळे नगर परिषदेला फायदा होत नसला तरी तोटाही होत नव्हता. कसाबसा खर्च भागत होता. येथे कोणते कार्यक्रम व्हावेत यासाठी असलेले नियम व त्यांची होणारी अंमलबजावणी यामुळे ते शक्य होत होते. त्यानंतर मात्र यावर काही लोकप्रतिनिधींनी कब्जा मिळवला. त्यामुळे येथे लग्न समारंभ, स्वागत कार्यक्रम, स्नेहसंमेलने होवू लागली. यामुळे नाट्यगृहाच्या खुर्च्या व अन्य साहित्याची तोडफोड असे प्रकारही घडू लागले. हे कार्यक्रम अगदी नाममात्र शुल्कात होवू लागल्याने तेव्हापासून हे नाट्यगृह तोट्यात गेले. www.konkantoday.com