
दापोली-खेड मार्गावर कुंभवे येथे अचानक कारला आग लागल्याने कार जळून खाक
दापोली-खेड मार्गावर कुंभवे येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. नफिज मुकादम यांच्या मालकीची कार कुंभवे शाळेजवळून जात असताना कारने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच गाडीला मोठ्या प्रमाणावर ज्वाळा भडकल्या आणि वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.
सध्या मोठ्या प्रमाणावर वातावरणाच्या तापमानात वाढ झाली आहे मात्र सदरचा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे घडला असावा असा अंदाज आहे
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीमध्ये प्रवास करणारे सर्वजण वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलालाही तातडीने पाचारण करण्यात आले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. अचानक लागलेल्या या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही




