
चेसमेन रत्नागिरी तर्फे सप्रे स्मृती आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन यंदाचे आठवे वर्ष : कोरोना मुळे यावर्षीची स्पर्धा ऑनलाईन घेण्याचा मानस
चेसमेन रत्नागिरी आणि के.जी.एन सरस्वती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेली सात वर्षे भारताचे पहिले राष्ट्रीय विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन केले जात असून यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊन चे सावट असताना स्पर्धा होणार की नाही असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच JSW फाउंडेशन, जयगड पोर्ट यांच्या सहकार्याने आयोजकांनी ऑनलाईन स्पर्धेची घोषणा केली आहे.
Lichess.org ह्या संकेतस्थळावर ही स्पर्धा एकूण तीन गटात घेण्यात येणार असून यंदाच्या स्पर्धेचे खास वैशिष्ठय म्हणजे सदर तिनही स्पर्धा स्पर्धकांना विनाशुल्क खेळण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय गुणांकनानुसार सदर स्पर्धेत तीन गट करण्यात आले आहेत.
पहिल्या गटात ज्या खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय गुणांकन २००० व त्यापेक्षा अधिक आहे अश्या खेळाडूंना, दुसऱ्या गटात ज्या खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय गुणांकन २००० च्या खाली आहे अश्या खेळाडूंना तर तिसऱ्या गटात १५०० गुणांकनाखलील खेळाडू सहभागी होऊ शकतात असे चैतन्य भिडे यांनी स्पर्धेची माहिती देताना सांगितले.
तीनही स्पर्धा मिळून आयोजकांकडून एकूण रू. ४०,०००/- एवढ्या रकमेची रोख बक्षिसे देण्यात येणार असून रत्नागिरीच्या खेळाडूंना सदर स्पर्धेत प्रोत्साहन म्हणून जिल्हास्तरीय बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय गुणांकनाचे विविध गट करून प्रत्येक गटात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून महिला खेळाडूंसाठी देखील विशेष पारितोषिके ठेवण्यात आल्याचे विवेक सोहनी यांनी सांगितले.
ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा म्हंटल्यावर तांत्रिक संयोजन, फेअरप्ले, खेळाडूंना तांत्रिक सहकार्य ह्या गोष्टींसाठी आयोजकांकडून विशेष निकष ठरवण्यात आले असून चैतन्य भिडे, विवेक सोहनी तसेच मंगेश मोडक ह्या जबाबदाऱ्या सांभाळणार असल्याचे दिलीप टिकेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमूळे नवोदित तसेच अनुभवी खेळाडूंना सरावासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले असून चेसमेन रत्नागिरी तर्फे याच धरतीवर सप्रे स्मृती स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन चेसमेन रत्नागिरीचे अध्यक्ष प्रसन्न अंबुलकर तसेच के.जी.एन सरस्वती फाउंडेशनच्या माधव हिर्लेकर यांनी केले आहे.
चेसमेन रत्नागिरी सात वर्षे ही स्पर्धा सातत्याने घेत असून ही नक्कीच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. गेली दोन वर्षे आम्ही त्यांच्यासोबत बुद्धिबळाच्या जिल्ह्यातील प्रचारासाठी काम करत असून अश्या स्पर्धा ह्या लोप पावत चाललेल्या खेळला नवसंजीवनी देतील आणि जिल्ह्यातून नक्कीच नवनवीन बुद्धिबलपटू तयार होतील असा विश्वास जे.एस.डब्ल्यू सी.एस. आर. हेड JSW चे अनिल दाधिच यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com