
पात्र मतदारांनी आपले नाव सामाविष्ट करण्यासाठी अर्ज करावा -डाॕ अजित थोरबोले
रत्नागिरी, : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार यादीमध्ये आपले नाव तपासणी करावे. ज्याचे नाव मतदार यादीत नाही, अशा पात्र मतदारांनी आपले नाव सामाविष्ट करण्यासाठी अर्ज करावा. आगामी निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी, 263-दापोली विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे. दापोली विधानसभा क्षेत्रात दिनांक 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादी दिनांक 6 ऑगस्ट रोजी प्रसिध्द झालेली आहे. प्रसिध्द झालेल्या मतदार यादीनुसार एकूण मतदार 281328 त्यापैकी एकूण स्त्री मतदार 146057 व एकूण पुरुष मतदार 135271 असे एकूण मतदार आहेत. २६३ दापोली विधानसभा मतदार संघातील दापोली / मंडणगड / खेड तालुक्यातील काही मतदान केंद्रावर जाण्यासाठी २ ते ३ कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालावे लागत असल्याने या ठिकाणी २१ नवीन मतदान केंद्र करण्यात आलेली आहेत.तसेच ज्या मतदान केंद्राच्या इमारती नादुरूस्त तसेच ज्या इमारतीमध्ये तीन पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत. अशा 23 मतदान केंद्रांची ठिकाणे बदलणे आवश्यक होती, अशी 23 मतदान केंद्राची ठिकाणे बदलण्यात आलेली आहेत. ज्या मतदान केंद्रावरती मतदारांची गर्दी होत असल्याने मतदारांचे त्या मतदार केंद्राच्या लगतच्या मतदार केंद्रामध्ये समायोजन/विलीणीकरण करण्यात आलेले एकूण 5 मतदान केंद्रं आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 371 मतदान केंद्र होती. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत 392 मतदान केंद्र असणार आहेत. नवीन गावात तयार झालेली मतदान केंद्र दापोली तालुक्यात 1, भाटघर 2. दळखण 3. चिंचाळी 4.कोंगळे 5.माटवण कोथळकोंड 6. वाघवे 7. बोरघर 8. पंचनदी व मंडणगड तालुक्यात 1.उंबरशेत 2.टाकवली व खेड तालुक्यात 1. वाडी जैतापूर अशी आहेत. दिनांक 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमापूर्वी 263-दापोली विधानसभा मतदार संघात एकूण 280261 एकूण मतदार होते. परंतु, त्यानंतर पुनरिक्षण कार्यक्रमानंतर एकूण 281328 मतदार आहेत. त्यामध्ये जेष्ट नागरीक मतदार 3949, युवा मतदार 3371 व दिव्यांग 1331 मतदार आहेत.000