
पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करील-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जलक्रांतीतून हरित क्रांती येणार आहे आणि हरित क्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही, तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे. पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पीक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्त्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाऊंडेशनने केले. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
22 मार्चच्या जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमात राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे याशिवाय पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक, राज्याच्या १८ जिह्यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झाले होते.
www.konkantoday.com