
कोव्हिशिल्ड’ लशीच्या दोन मात्रांमधील अंतर सहा ते आठ आठवड्यांपर्यंत वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना
नव्या शास्त्रीय अहवालांचा दाखला देत ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या दोन मात्रांमधील अंतर सहा ते आठ आठवड्यांपर्यंत वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने सोमवारी राज्यांना दिल्या. त्यामुळे ‘कोव्हिशिल्ड’ची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या मात्रेसाठी सहा ते आठ आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार असून, लसलाभार्थ्यांमध्ये नव्या गोंधळाची भर पडली आहे.
देशभर लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र, कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा सहा ते आठ आठवड्यांच्या अंतराने दिली असता अधिक संरक्षण मिळणार असल्याचा अहवाल ‘नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ऑन इम्युनायजेशन’ने दिला आहे. त्यामुळे सध्या चार आठवड्यांनंतर दिली जाणारी ‘कोव्हिशिल्ड’ची दुसरी मात्रा यापुढे सहा ते आठ आठवड्यांच्या अंतराने दिली जाईल.त्याचवेळी दुसरी मात्रा देण्यास आठ आठवड्यांपेक्षा विलंब होऊ नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे. नवी सूचना ही केवळ कोव्हिशिल्ड लशीसाठी असून ‘भारत बायोटेक’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ लशीला ही सूचना लागू नसल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले.
www.konkantoday.com