
विजेता मोर्ये व विजय मोर्ये “इंडिया स्टार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी : रत्नागिरीची सुपुत्री व सामाजिक कार्यकर्ती विजेता विजय मोर्ये यांना मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच आदर्श युवा पदवीधारक सामाजिक कार्यकर्ती (MSW) म्हणून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल इंडिया स्टार जीवन गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. हा मानाचा पुरस्कार अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याच सोहळ्यात कोलधे, कुंभारगावचे (ता. लांजा) सुपुत्र आणि विजेता यांचे पती विजय विश्राम मोर्ये यांना देखील सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन “इंडिया स्टार जीवन गौरव – आदर्श युवा सामाजिक पदवीधारक कार्यकर्ता (एमएसडब्ल्यू) २०२५” हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा दुहेरी सन्मान म्हणजे दाम्पत्याच्या कष्ट, आत्मविश्वास व समाजसेवेच्या बांधिलकीचे खरे प्रतीक ठरला आहे. या विशेष क्षणाबद्दल विजेता मोर्ये म्हणाल्या, “आयुष्यातील हा पहिला एकत्र पुरस्कार आमच्यासाठी सुवर्णक्षण आहे. हा आमच्या कष्टांचा विजय, आत्मविश्वासाचा मुकुट आणि समाजसेवेच्या व्रताची खरी ओळख आहे. आणि हो, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून अनेक ध्येय गाठायची आहेत व समाजासाठी काहीतरी मोठे करायचे आहे.”
या पुरस्कारासाठी इंडिया स्टार जीवन गौरव पुरस्कार आयोजक व नॉमिनेशन देणारे सर्व पदाधिकारी व या अत्यंत महत्त्वाच्या नामांकनासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल रॉयल ग्रुपचे सर्वेसर्वा नितीन झगरे यांचे मोर्ये दाम्पत्यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच आपल्या एमएसडब्ल्यू शिक्षणातील गुरुजन, वर्गशिक्षक, फील्डवर्कदरम्यान साथ देणारे शिक्षक व सर्व संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते, आई-वडील आणि समाजातील प्रत्येक घटकाला हा सन्मान समर्पित केला.




